मुंबई : महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेने संयुक्तपणे महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (MRDP) अंतर्गत आवश्यक तयारी आणि प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली असल्याची माहिती आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे. त्यांनी नमूद केले की, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या शहरांसाठी 3200 कोटी रुपयांचा हा एमआरडीपी प्रकल्प दीर्घकालीन पूरनियंत्रण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता आणि कृष्णा व पंचगंगा नद्यांची वहनक्षमता वाढवली जाईल. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. दरम्यान, हा परिवर्तनशील उपक्रम साकार करण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारत सरकारचा आर्थिक व्यवहार विभाग तसेच जागतिक बँकेचे आभार व्यक्त केले आहेत.
Milestone crossed in mission MRDP towards Permanent Solution for Kolhapur & Sangli Floods: Glad to inform that the Government of Maharashtra and the World Bank has together successfully completed the preparation and process under the Maharashtra Resilience Development Programme… pic.twitter.com/7rIBVWviW3 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2026
काय म्हटले आहे मुख्यमंत्र्यांनी –
महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे ‘महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (MRDP) अंतर्गत तयारी आणि प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, हे कळवताना आनंद होत आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर, ३,२०० कोटी रुपयांचा ‘MRDP’ हा उपक्रम कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या भागांत दीर्घकालीन पूर-सक्षमता (flood resilience) निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठी पाऊलवाट ठरणार आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याचे संकलन वाढवणे, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारणे आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणा (stormwater drainage systems) बळकट करणे यांसारखी कामे केली जातील.
हा परिवर्तनकारी उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्न केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी, भारत सरकारचा आर्थिक व्यवहार विभाग आणि जागतिक बँक यांचे मी आभार मानतो.
आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची पुढील पावले जलद गतीने उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.