नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीच्या हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय शिवानी गजभिये असे मृतक तरुणी तर किरण आत्राम असे जखमी इसमाचे नाव आहे. हॉटेलच्या रूम क्रमांक 302 मध्ये 28 वर्षीय शिवानी गजभिये आणि किरण आत्राम हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
शिवानीच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव असल्याने तिचा मृत्यू झाला, तर किरण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रूममधून किंकाळ्या ऐकू आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. रूममध्ये दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, तर बाजूलाच चाकू आढळून आला. दोघेही रेल्वे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वादानंतर किरणने शिवानीवर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी केल्याचा प्राथमिक संशय आहे. बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात हलवलं. शिवानीचा मृत्यू झाला असून किरणवर उपचार सुरू आहेत. या रक्तरंजित घटनेमागचं नेमकं कारण काय, हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा बेलतरोडी पोलीस तपास करत आहेत.