ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळ येथील चाळीतील पहिला मजलावरील गॅलरीचा भाग कोसळला असून यावेळी तीन जण जखमी झाले आहेत. तर एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळ येथील 25 ते 30 वर्ष जुन्या बांधकाम चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. यात तीन जण जखमी झाले असून एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. उर्मिला जैस्वाल वय 30 वर्ष, जयकुमार जैस्वाल वय 10 वर्ष, विनीतकुमार जैस्वाल 8 वर्ष अशी जखमींची ओळख समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व आपत्कालीन विभाग अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ हजेरी लावली आणि आपत्कालीन विभाग अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी अग्निशमन दल, प्रभाग समितीचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान सतत पडलेला मुसळधार पावसामुळे ही घटना घडली असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मोशी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालय इमारतीवर कोसळला. हजारो टन कचरा इमारतीवर कोसळल्याने तीन मजली इमारत कोसळून त्यात काही कामगार अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आतापर्यंत 11 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजूनही 12 जण ढिगाऱ्याखाली अडकून पडले असल्याची माहिती मिळत आहे.