Pune Divorce News: पुण्यातील एक धक्कादायक आणि तितकीच चर्चेची घटना समोर आली आहे. दोन-तीन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर मोठ्या आशेने विवाहबंधनात अडकलेल्या एका सुशिक्षित जोडप्याने अवघ्या 24 तासांतच घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पतीचा नोकरीतील अनिश्चितता आणि एकत्र राहण्याबाबतचे मतभेद हे या घटस्फोटामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
सुशिक्षित जोडपे, पण वैचारिक मतभेद
या प्रकरणातील महिला व्यवसायाने डॉक्टर असून तिचा पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. लग्नापूर्वी हे दोघेही एकमेकांना 2-3 वर्षांपासून ओळखत होते. मात्र, लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्यात भविष्यातील राहणीमानावरून गंभीर चर्चा झाली आणि त्यातून टोकाचे मतभेद निर्माण झाले. कोणताही वेळ न घालवता या जोडप्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
हेही वाचा – Pink Parking For Pregnant Women : गर्भवती महिलांसाठी खास गुलाबी पार्किंग; 'या' शहरातील मॉलचा हटके उपक्रम
काय होते नेमके कारण?
घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पाहणाऱ्या वकील राणी सोनवणे यांनी यामागचे कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हा प्रेमविवाह होता, मात्र लग्नानंतर पतीने पत्नीला सांगितले की तो एका जहाजावर (Ship) काम करतो. त्याच्या नोकरीचे स्वरूप असे आहे की, त्याला कधी आणि कुठे पोस्टिंग मिळेल किंवा तो किती काळ घरापासून लांब राहील, हे तो सांगू शकत नव्हता. पतीच्या या अनिश्चित जीवनशैलीमुळे आणि एकत्र राहण्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे पत्नीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
शांततेने आणि सामोपचाराने घटस्फोट
विशेष म्हणजे, या प्रकरणात पती-पत्नीमध्ये कोणताही हिंसाचार किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप नव्हते. वकिलांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्षांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवत आणि भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी मैत्रीपूर्ण वातावरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. भारतात घटस्फोटाचे खटले वर्षानुवर्षे चालतात, मात्र या सुशिक्षित जोडप्याने अवघ्या 24 तासांत विवाह संपवून एक वेगळाच चर्चेचा विषय निर्माण केला आहे.