राज्यात गाजलेलं वैष्णवी हगवणेचं हुंडाबळी प्रकरणानंतर देखील महाराष्ट्राच्या विविध हुंडाबळीच्या घटना समोर येत आहेत. वैष्णवी हगवणेचं हुंडाबळी प्रकरणाने राज्याला हादरवलं होत. त्यानंतर आता बीडमध्ये पुन्हा एकदा पैशांच्या लालसेपोटी एका विवाहितेला जीव गमवावा लागला आहे. बीडच्या केज तालुक्यात गायी-म्हशी घेण्यासाठी माहेरून 10 लाख आणण्याचा तगादा लावणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बीडच्या केजमधील अंबाजोगाई तालुक्यातील तळणी, येथील रहिवासी गोविंद आण्णा गित्ते यांची मुलगी रुतुजा हिला तिच्या सासरच्यांकडून गायी आणि म्हशी खरेदी करण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावेत अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ देखील करण्यात येत होता. याच छळाला कंटाळून या विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे.
याप्रकरणी रुतुजा हिचा विवाह बनकरंजा, तालुका केज येथील अंकुश जनार्धन नागरगोजे याच्याशी झाला होता. लग्नानंतर तिला नवीन गायी व म्हशी खरेदी करण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून करण्यात येत होती. या मागणीसाठी ऋतुजाचा सातत्याने छळ केला जात होता. तिला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील गोविंद गित्ते यांनी पती अंकुश जनार्धन नागरगोजे याच्यासह सासरे, सासू, दीर आणि नणंद अशा एकूण पाच जणांविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.