बापरे! 73 वर्षाच्या वृध्देला चक्क लग्नाचं आमिष दाखवून 62 वर्षांच्या वृध्दानं फसवलं; तब्बल 57 लाखाला घातला गंडा

संशयित वृद्ध अनुज याने या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. दोघे पुण्यात घर घेऊन राहू, असे सांगत त्याने एकट्या राहणाऱ्या वृध्द महिलेकडून पैसे उकळले. तिचे सोन्याचे दागिने चोरले. मग तो तिला टाळू लागला.

बापरे! 73 वर्षाच्या वृध्देला चक्क लग्नाचं आमिष दाखवून 62 वर्षांच्या वृध्दानं फसवलं; तब्बल 57 लाखाला घातला गंडा

डोंबिवली : तरुण-तरुणींमध्ये लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच, विवाहबाह्य संबंधांत महिलेची किंवा पुरुषाची फसवणूक झाल्याचेही अनेक प्रसंग घडतात. पण आता एक वेगळाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. 62 वर्षांच्या वृद्धाने 73 वर्षाच्या वृध्देला चक्क लग्नाचं आमिष दाखवून 57 लाखांहून अधिक रकमेला गंडा घातल्याचं समोर आलं आहे.

डोंबिवली पश्चिम भागात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुस्थितीमधील वस्तीत राहणाऱ्या एका 73 वर्षाच्या वृध्द महिलेला एका 62 वर्षाच्या वृध्दाने लग्नाचे आमिष दाखविले. या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी संपर्क वाढवला. यानंतर तिच्याजवळील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम अशी एकूण 57 लाख 40 हजार रूपयांची लूट आणि फसवणूक केली आहे.

हेही वाचा – ऑनलाईन गेमच्या व्यसनाचा बळी! जुगारासारख्या खेळांमुळे कर्जबाजारी होऊन तरुणाची आत्महत्या

गेल्या महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या वृद्ध महिलेनं पोलिसांत धाव घेतली. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी फसवणूक करणारा 62 वर्षाचा वृध्द अनुज तिवारी याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या वृध्दाचा कुठलाही पत्ता, पूर्ण नाव आपणास माहिती नसल्याचे वृध्द महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की गुन्हा दाखल अनुज तिवारी (62) याने वर्तमानपत्रात समवयस्क जोडीदार मिळावा म्हणून लग्नासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून अनुज तिवारी फसवणूक झालेल्या डोंबिवलीतील महिलेच्या संपर्कात आला. फसवणूक झालेली 73 वर्षाची महिला आणि अनुज तिवारी यांचे नियमित बोलणे सुरू झाले. त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. या संपर्कातून अनुज तिवारी याला वृध्द महिला ही घरात एकटीच राहत असल्याचे निदर्शनास आले. अनुज याने या महिलेचा विश्वास संपादन केला. आपण दोघेही एकत्रित पुणे येथे घर घेऊन राहू, असे आश्वासन त्याने या एकट्या राहणाऱ्या वृध्द महिलेला दिले.

आपणास चांगला जोडीदार मिळतो आहे, असा विचार करून फसवणूक झालेल्या महिलेने अनुज यांच्यावर विश्वास ठेवला. अनुज पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन राहू लागला. आपण लग्न करून एकत्र राहू असा विश्वास अनुज याच्याकडून मिळाल्याने पीडित महिलेने त्याच्याबरोबर त्याच्या मागणीप्रमाणे आर्थिक व्यवहार सुरू केले. अनुज याने वृध्देला पुणे येथील घर खरेदी करत असल्याचे सांगितले. यासाठी त्याने वृध्देकडून 35 लाख रूपये टप्प्याटप्प्याने काढून घेतले. घर खरेदीच्या बनावट पावत्या वृध्देला दाखविल्या. ही वृध्द महिला एकटीच असल्याने या महिलेला लुटण्याचा विचार अनुज तिवारी यांच्या मनात डोकावू लागला. वृध्देच्या डोंबिवलीतील घरात राहत असताना अनुज तिवारी याने वृद्धेच्या घरातील कपाटातील 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिच्या नकळत चोरले. तिचे डेबिट कार्ड चोरून त्या माध्यमातून बँकेतून दोन लाख 40 हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. असा एकूण 57 लाख 40 हजार रूपयांचा भरभक्कम ऐवज ताब्यात आल्यानंतर अनुज यांनी वृध्द महिलेला संपर्क करणे टाळण्यास सुरूवात केली. वृध्द महिलेला अनुज याच्याकडून प्रतिसाद मिळणे बंद झाल्यावर तिने घरातील वस्तूंची तपासणी केली असता, कपाटातील सोन्याचा ऐवज गायब असल्याचे तिच्या लक्षात आले.

हेही वाचा – वाढदिवसा दिवशी संपवले आयुष्य… 5 वर्षांच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

आपणास लग्नाचे, एकत्रित राहण्याचे आमिष दाखवून आपला विश्वासघात करून अनुज तिवारी यांनी आपल्या घरात चोरी आणि फसवणूक केली म्हणून वृध्देने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number