मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूडचे शहेनशहां म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाईल. मनोरंजनसृष्टीतील अतुलनीय कार्यासाठी अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था मागील ३४ वर्षांपासून पुण्यात कार्यरत आहे. मंगेशकर कुटुंबियांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्यावतीने दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन २४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत २१२ जणांना मंगेशकर पुरस्कार देण्यात आला आहे. लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ २०२२ पासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नावाचा एक पुरस्कार पण संस्था प्रदान करत आहे. पहिला लता मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. तर दुसरा लता मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल २०२३ रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. आता तिसरा लता मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल २०२४ रोजी अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे. यंदाचा पुरस्कार वितरणाचा सोहळा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, मुंबई येथे बुधवार २४ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पार पडणार आहे.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अमिताभ बच्चन
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रदीर्घ संगीत सेवा साठी ए आर रेहमान
मोहन वाघ उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार गालिब नाटकाला
समाजसेवेसाठी आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला
वाग्विलासीनी प्रदीर्घ साहित्य सेवा पुरस्कार मंजिरी फडके
मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अशोक सराफ
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार पद्मिनी कोल्हापूरे
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार रुपकुमार राठोड
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार भाऊ तोरसेकर
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अतुल परचुरे
मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुडा