बदायू, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : उत्तर प्रदेशमधील बदायूं येथे साजिद नावाच्या व्यक्तीने दोन मुलांची हत्या केली. साजिद हा केशकर्तनालय चालवत होता. तो दुपारी दुकान बंद करून घरी जात असताना एका ओळखीच्या घरात गेला. पत्नीच्या बाळंतपणासाठी त्याने पाच हजार रुपये कर्ज म्हणून मागितले. घरातली महिला साजिदला ओळखत होती त्यामुळे तिने पैसे दिले. पैसे घेतल्यानंतर साजिदने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने महिलेच्या तीन मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला. दोन मुलांची हत्या करून साजिद घराबाहेर पळाला. घराबाहेर त्याचा भाऊ जावेद बाईक घेऊन थांबला होता. याच बाईकवर बसून साजिद जावेदसोबत पळून गेला.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. साजिदबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी साजिदने पोलिसांना चकवून पळण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्यासाठी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. चकमक झाली आणि गोळीबारात साजिद ठार झाला. चकमकीत एक पोलीस निरीक्षक जखमी झाला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार साजिद आणि मृत मुलांच्या आईवडिलांचा एक जुना वाद होता. हा वाद विसरून साजिदला पत्नीच्या बाळंतपणासाठी पैसे दिले असताना त्याने मुलांची हत्या केली. हे का घडले याचे उत्तर अनुत्तरीत राहिले.