मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : धारावीतील चमडा बाजारात एकेजी नगरमध्ये धारावी विकास प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या भागातील प्रत्येक घराचे आणि कुटुंबाचे बायोमेट्रीक सर्वे सुरू आहेत. काही कुटुंबांकडून याचा गैरफायदा घेत पक्की घरे बनवली जात आहेत. या पक्क्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.
धारावीमध्ये सध्या अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात फोफावली असून कच्च्या घरांच्या जागी पक्की घरे बांधली जात आहेत. या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेला टीकेचे धनी बनवले जात आहे. अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने अनधिकृत पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता राजेश राठोड यांच्यासह महापालिकेचे पाच अभियंते, ५० कामगार, २ गॅस कटरच्या माध्यमातून धारावी व शाहू नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या संरक्षणात या पक्क्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे काम केले जात आहे. धारावी विकास प्रकल्पांचे कामे हाती घेण्यात आल्याने याच्या आड ही अनधिकृत पक्की बांधकामे सुरू होती. या जुन्या झोपड्यांच्या जागेवर ही बांधकामे केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.