मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत आणि विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी आठ हजार ६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४, आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक २०२४ विधानसभेत सादर केले. विधानपरिषदेमध्ये उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे यांची सभापती तालिकेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषणा केली.