मुंबई, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त खोटे होते. स्वतः पूनमनेच पीआर टीमच्या मदतीने हे खोटे वृत्त पसरवले होते. कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वतःच्या निधनाची खोटी बातमी पसरवली असे पूनमने समाज माध्यमावर व्हिडीओ शेअर करून जाहीर केले. पूनमने या प्रकारासाठी चाहत्यांची जाहीर माफी मागितली. याआधी पूनमच्या इन्स्टा अकाउंटवर एक पोस्ट आली होती. ही पोस्ट पूनमच्या पीआर टीमकडून आली होती. पोस्टमध्ये पूनमचे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्यामुळे ३२ व्या वर्षीच निधन झाल्याची माहिती देण्यात आली होती. ही पोस्ट वाचून अनेकांना धक्का बसला. पण नंतर पूनमच्या अंत्यसंस्काराच्या नियोजनाबाबत कोणतीच माहिती पूनमच्या नातलगांकडून वा तिच्या पीआर टीमकडून आली नाही. यामुळे पूनमच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याची शंका अनेकांना वाटू लागली. अखेर हीच शंका खरी ठरली. स्वतः पूनमने एक व्हिडीओ शेअर करून निधनाची खोटी बातमी पसरवून कर्करोगाविषयी जनजागृती केल्याचे सांगितले. पूनमच्या या कृतीवर अनेकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पूनमच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. तर काही जणांनी पूनमच्या निधनाचे खोटे वृत्त देण्याच्या कृतीवर सडकून टीका केली.