अयोध्या, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जवळ येऊ लागल्यामुळे देशभर राममय वातावरण झाले आहे. या वातावरणात इस्रोने १६ डिसेंबर २०२३ रोजी घेतलेले अयोध्येचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रात अयोध्येचा मोठा भाग दिसतो आहे. छायाचित्रात राम मंदिर, दशरथ महाल, शरयू नदी, अयोध्या रेल्वे स्थानक दिसत आहे. मागील काही दिवसांपासून अयोध्येत दररोज धुके पडत आहे. यामुळे अयोध्येचे नवे सुस्पष्ट छायाचित्र उपग्रहाने अद्याप घेतलेले नाही. पण डिसेंबरमधील छायाचित्रावरून अयोध्येच्या नव्या रुपाचा अंदाज येतो.
अंतराळात भारताचे ५० पेक्षा जास्त उपग्रह आहेत. इस्रो या उपग्रहांना हाताळते. या भारतीय उपग्रहांचे रिझोल्युशन एक मीटरपेक्षा कमी आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर हे उपग्रह एक मीटरपेक्षा कमी आकाराच्या वस्तूंचे छायाचित्र घेऊ शकते. हैदराबादच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर येथे उपग्रहाने काढलेल्या फोटोंवर प्रक्रिया (फोटो प्रोसेसिंग) केली जाते.
राम मंदिर बांधण्यासाठीही इस्रोच्या उपग्रहाची मदत घेण्यात आली. उपग्रहाच्या मदतीने मंदिरासाठी अचूक नकाशा तयार करण्यात आला.