मातोरी, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून समर्थकांसह मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. ही पदयात्रा शनिवारी मनोज जरांगे यांच्या गावी मातोरी येथे पोहोचली. मातोरी येथून रविवारी मनोज जरांगे समर्थकांसह पदयात्रा करत नगरच्या दिशेने रवाना झाले. टप्प्याटप्प्याने पुढे सरकत मनोज जरांगे यांची पदयात्रा प्रजासत्ताक दिनी मुंबईत पोहोचणार आहे.
राज्य शासन आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक
महाराष्ट्र शासन आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. यामुळे नोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तेलंगणात हैदराबाद येथे जुने दस्तावेज आहेत. हे दस्तावेज तपासले जात आहेत. अनेक दस्तावेज उर्दू, फारसी, मोडी लिपीत आहेत. हे दस्तावेज तज्ज्ञांच्या मदतीने तपासले जात आहेत. हे काम वेगाने सुरू आहे. कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे तसेच मागासवर्ग आयोग मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये काम करत आहे. मराठा समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा केला जात आहे. मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये या संदर्भात विशेष अधिवेशन घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे; असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.