ठाणे, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शाळेची फी भरली नाही म्हणून पेपर लिहित असलेल्या विद्यार्थ्याला वर्गातून बाहेर काढले. ही धक्कादायक घटना ठाणे शहरातील वर्तकनगरच्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली. पालकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी झाली. परिस्थितीचा अंदाज येताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.
दरमहा फी भरणाऱ्यांना कधीतरी फी भरायला उशीर झाला तर शाळा दंड आकारते. ऑनलाईन फी शाळा प्रशासनाला अमान्य आहे. शाळेत मराठी बोलल्यास ५० रुपये दंड, विद्यार्थिनीने टिकली लावली तर ५० रुपये दंड असे प्रकार शाळेत सुरू असल्याची तक्रार काही पालकांनी केली. या प्रकरणी शाळा प्रशासनाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासनाने अद्याप उत्तर दिलेले नाही.