नाशिक, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार १२ जानेवारीपासून ११ दिवसांचा उपवास सुरू केला आहे. अयोध्येत राममूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा करणार असल्यामुळे धार्मिक विधीचा भाग म्हणून पंतप्रधानांनी उपवास सुरू केला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत एक्स अर्थात ट्विटर हँडलवरून एक ध्वनी संदेश अर्थात ऑडियो मेसेज प्रसिद्ध केला आहे. या संदेशातून त्यांनी उपवास सुरू केल्याची माहिती दिली. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने एका ऐतिहासिक आणि शुभ प्रसंगाचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभणार आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी आनंद व्यक्त केला. व्यस्त वेळापत्रक आणि जबाबदाऱ्या असूनही सर्व विधी काटेकोरपणे पाळणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘हे माझे भाग्य आहे की मी नाशिक धाम-पंचवटीपासून माझ्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाची सुरुवात करत आहे. पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीरामांनी बराच वेळ घालवला’ असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी उपवास सुरू केल्याचे जाहीर केले.