अकोला, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देतदेत युवकानं ब्लेडच्या साहाय्याने तिचे केसही कापले. एवढ्यावरच समाधान न झाल्यानं त्यानं तिला सलूनमध्ये नेत तिचे मुंडन करायला लावलं. पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ नेत बालिकेला सर्वांसमक्ष विवस्त्र करत बलात्काराचा प्रयत्न केला. या घटनेमुळं अकोला शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुलीची अवस्था पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीतील महिलांनी खदान पोलिस ठाण्यात ठिय्या दिला व आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली. तणाव वाढल्यानं परिसरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
गणेश कुंभरे (वय २९) असे आरोपीचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पीडित मुलीचे पालक मजुरी करतात. गणेशने पीडित मुलीला १५ नोव्हेंबरला मारहाण करीत आपल्या घरी नेले. मुलीला सिगारेटचे चटके देत त्यानं तिच्यावर अनेकदा बळजबरी केली. मुलीनं विरोध केल्यानं संतापाच्या भरात गणेशने ब्लेडच्या साह्यानं मुलीचे केसंही कापले. त्यानंतर त्याने तिला पुन्हा मारहाण केली.
कुणाला कळेल या भीतीनं गणेशने पीडितेला सिंधी कॅम्पमधील एका सलूनमध्ये नेलं. घरात वाद झाल्यानं तिनेच केस कापून घेतले, त्यामुळे तिचं मुंडन करून देण्यास गणेशनं सलूनवाल्यास सांगितलं. मुंडन करून घेतल्यानंतर गणेशने तिला पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ आणलं व सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करीत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मारहाणही केली. या वेळी परिसरातील चार युवकांनी गणेशला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केल्यानं गणेश पळुन गेला. मात्र कुणालाही हा प्रकार सांगितल्यास परिवाराला जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली.
घटनेनंतर घाबरलेली मुलगी घरी परतली. त्यावेळी तिच्या पालकांनी तिला या प्रकाराबद्दल विचारणा केली. तब्बल दोन दिवस ती भीतीपोटी रडत होती. गणेश परिवाराला मारून टाकेल, या दहशतीत ती होती. पालकांनी समजूत घातल्यानंतर अखेर पीडितेनं घडलेला प्रकार सांगितला. मुलींच्या पालकांनी तातडीनं खदान पोलिस स्टेशन गाठत गणेशविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी पीडितेकडे पोहोचल्या. मुलीची अवस्था पाहिल्यावर साऱ्यांनाच संताप अनावर झाला. त्यामुळे या महिलांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं.
शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरापर्यंत अरुधती शिरसाट, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, वंदना वासनिक, आशिष मांगुळकर, सचिन शिराळे आदी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यामुळे खदान भागातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांनी गणेशला तातडीनं बेड्या ठोकत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.