मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना राज्यात २००३ मध्ये कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनेच ही भरती सुरू केली. त्यानंतर २०१० साली अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनदा कंत्राटी भरती काढण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना २०११ मध्ये कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. यानंतर २०१३ सालीही अशीच भरती काढण्यात आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.