मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जारंगे यांना भेटणार होते. पण सुरक्षेच्या कारणामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे.
याआधी काही तासांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरून उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ही चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठे ट्वीट करून व्हिडीओ संपादीत करून चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट…
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादीत करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादीत करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
आदित्य ठाकरेंचे ट्वीट
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ट्वीट केले.
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट जसेच्या तसे….
“बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्य मुख्यमंत्री ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता? खरतर हीच ती गद्दार वृत्ती! गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय. ह्या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार??? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय!