महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने अनेक घडामोडी घडत असतात. राजकारण म्हंटल की आरोप-प्रत्यारोप आलेच. आणि महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर आता एकीकडे अजित पवारांनी केलेला बंड चांगलाच चर्चेत आहे. तर, दुसरीकडे भाजपातील आमदार नाराज झाल्याचे समोर येत आहे. याच आमदारांची मनधरणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.
राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता भाजपा आमदारांची मनधरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी शुक्रवारी (दि. ७ जुलै) भाजपाकडून बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व आमदारांना या बैठकीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मुंबईतील चर्चगेट येथील गरवारे क्लब येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या बैठकीमागचं मुख्य कारण हे नव्या राजकीय घडामोडीनंतर भाजपामधील नाराज असलेल्या आमदारांची नाराजी या बैठकीत दूर केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील राजकारणात प्रत्येक पक्षात वादविवाद, हेवेदावे पाहायला मिळत आहेत. तर, आता नाराज असलेल्या आमदारांकरिता भाजपाने आयोजित केलेल्या या बैठकीत नेमकं काय घडणार? भाजपाच्या आमदारांची नाराजी दूर होणार का? ही बैठक नेमके काय वळण घेईल? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.