पुणे , १९ मे २०२३, प्रतिनिधी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आव्हानाला तोंड कसे देणार यावर चर्चेला सुरुवात झालेली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी पुण्यात होत आहे. त्यामुळे आगामी काळात आगामी निवणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात संघटनेमध्ये काय कामे केली पाहिजेत, नागरिकांपर्यंत कसे पोहचायचे, विरोधकांवर मात कशी करावी यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंथन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जे. पी. नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. कर्नाटक निवडणुकीनंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या दोन्ही बैठका बंद दाराआड होणार असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये बूथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा, केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत, मोदी सरकारच्या या काळातील योजना घरोघरी पोचविण्यासाठी महाजनसंपर्क अभियानाची घोषणा केली जाणार आहे. तसेच राजकीय प्रस्ताव, संघटनात्मक ठरावही या कार्यकारिणीच्या बैठकीत पारीत केले जाणार आहेत.