शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मधला नवा वाद बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा प्लॅन बी सुरू आहे, असे विधान चव्हाणांनी केल्यानंतर शरद पवारांनी चव्हाणांना खोचक प्रत्युत्तर दिले.
साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांना चव्हाणांच्या विधानाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा चव्हाणांनी त्यांची पक्षात काय जागा आहे, ते त्यांनी आधी तपासावे असा टोला पवारांनी लगावला. ‘त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे.. ते ए आहेत, की बी आहेत की सी आहेत की डी आहे ते आधी तपासून घ्यावे. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारले की चव्हाणांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन लोटस’ने देशाचा आत्मा घालवल्याची टीका भाजपवर केली. सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा आत्मा आहे. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली देशाचा हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपाने घेतली. धार्मिक तेढ निर्माण करून परस्परांना भिडविण्याचे पाप भाजपने केले आहे. काहीही करून सत्ता मिळवणे आणि ती मिळत नसेल तर सत्तासंघर्ष वाढवणे ही भाजपची धोकादायक नीती झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश लोक फोडून भाजपने सरकार आणले. सत्ता मिळाली नाही आणि लोकांनी नाकारले तर सत्ता आणि संपत्तीचा वापर करून माणसे फोडायची, त्याचसोबत संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करायची. हे सूत्र भाजपने स्वीकारल्याचे शरद पवार म्हणाले.