महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्यावतीने राज्यभरात आजपासून तीन दिवस संप पुकारण्यात आला होता. महावितरणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महावितरणाच्या कर्मचाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पाडली, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं फडणवीसांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले.
भांडुप परिमंडल कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला देण्यात आलेल्या समांतर परवान्याचा निषेधार्थ म्हणून आज राज्यभरात महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संदर्भात फडणवीस व आंदोलनकर्ते यांच्यात बैठक पार पडली, ज्यात महावितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्य सरकार तिन्ही कंपन्यांचं खाजगीकरण करणार नाही, अशी माहिती दिली आहे. याशिवाय वीज कंपन्यांमध्ये सरकार ५० हजारांची गुंतवणूक करणार असल्याचे आणि वयोमर्यादा वाढवून कर्मचारी भरती करणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच वेतनाबाबत असलेला मुद्दादेखील निकाली काढला जाईल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या बैठकीनंतर बऱ्याच जिल्ह्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचे संप मागे घेण्यात आले होते परंतु अमरावती आणि उस्मानाबाद येथील आंदोलनकर्ते संपावर ठाम होते. शेतकऱ्यांना माफक दरात वीजपुरवठा मिळणार नाही, तसेच क्रॉस सबसिडी मिळणार नाही ज्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांवर परिणाम होतील, अशी भीती आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. पण अखेर केंद्राकडून आदेश आल्यानंतर अमरावती व उस्मानाबाद येथीलही आंदोलनकर्त्यांनी संप मागे घेतला.