नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये एका गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाला असून उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनम करण डोंगरे (वय 19) असे या मृत महिलेचे नाव असून ही महिला गरोदर होती. पोटात पाणी कमी असल्यामुळे ऐरोलीतील पालिकेच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिला कोणतं तरी इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर महिलेची प्रकृती खालावली. पुढे तीन तास ही महिला रुग्णालयात बेशुद्ध होती. त्यानंतर वाशी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान हा महिलेचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे या महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.
30 जून रोजी मी माझ्या पत्नीला रुग्णालयात दाखल केलं होतं. तिचा आठवा महिना सुरू होता. दुपारी तिला कोणतं तरी इंजेक्शन दिलं, त्यानंतर तिला रिअॅक्शन झालं. त्यानंतर ती बेशुद्ध पडली होती. डॉक्टरांनी तिला वाशीच्या रुग्णालयात दाखल करण्याचं सांगितलं. आम्ही वाशीच्या रुग्णालयात घेऊन आल्यानंतर तासाभरात माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. आम्हाला न्याय पाहिजे, हे असं का घडलं, याचा मला जाब पाहिजे, असे त्या महिलेल्या पतीने सांगितले आहे.
दरम्यान, याबद्दल रुग्णालयाकडून अद्याप डॉक्टरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी आरोग्य समिती सभापती डॉ जयाजी नाथ यांनी प्रतिक्रिया दिली. “आज या रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दुसरी महिला ही व्हेंटिलेटरवर आहे. यामध्ये कुणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल’ असं आश्वासन जयाजी नाथ यांनी दिलं. तसेच उपचारादरम्यान झालेल्या आई आणि बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात येईल. या समितीत नवी मुंबई महापालिका वगळता इतर चार महापालिकेच्या तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असेल, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिली.