मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कृषी विभागामार्फत देण्यात येणारे २०२०, २०२१ आणि २०२२ करिता शेतकरी आणि शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली.
राज्य शासनाच्या कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व तत्सम संस्थाना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट), पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतात.
पुरस्कार वितरणात २०२० पासून खंड पडला होता. कोरोना संकट हे यामागचे प्रमुख कारण होते. अखेर धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०२०, २०२१ आणि २०२२ करिताचे विभागनिहाय कृषी पुरस्कार जाहीर केले. कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांच्या सोबतीने प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते, त्या रकमेतही धनंजय मुंडे यांनी नुकतीच तब्बल चार पटीने वाढ केली आहे. लवकरच या पुरस्कारांचे शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करून वितरण करण्यात येणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.