खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली आहे. ही सुपारी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी याबाबत मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस निवडणुका लढवण्यात, पक्ष फोडण्यात व्यस्त असून लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचं त्यांना काही पडलं नसल्यांच संजय राऊत यांनी म्हटलंय. यावर आता गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. खासदार संजय राऊत यांचं पत्र सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का? असा माझा प्रश्न आहे.
संजय राऊत असोत की कुणी असो कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता नक्की आहे का? त्यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे का? यासंदर्भातली सगळी कारवाई ही आपल्याकडे गुप्तचर विभागातर्फे केली जाईल. कुणालाही सुरक्षा देण्याचं काम एक समिती करते. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती काम करते. आम्ही त्यांचं पत्र कमिटीकडे पाठवत आहोत. या संदर्भात आपण कधीही महाराष्ट्रात राजकारण करत नाही असं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आवश्यक असेल तर त्यांना सुरक्षा पुरवली जाईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे
संजय राऊत यांना अलीकडच्या काळात प्रसिद्धीची सवय लागली आहे. आहे. विनाकारण कुठला तरी आरोप करायचा आणि प्रसिद्धीत राहायचं. २ हजार कोटींचा आरोप केला. कधी हल्ल्याचा आरोप, पण एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. पूर्वी त्यांच्या आरोपांना आम्ही उत्तर द्यायचो, अलिकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचं? रोज खोटं बोलल्याने सहानुभूती मिळत नाही. असा टोला फडणवीस यांनी लगावला. त्यामुळे याने काहीही फायदा होणार नाही. त्यांना सहानभूती मिळेल असं वाटतंय, तर त्यांना ती मिळणार नाही. रोज खोटं बोलल्याने सहानभूती मिळत नाही. लोकांना हे सर्व लक्षात येतं, असं फडणवीस यांनी म्हटलय.