बंजारा समाज व या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी संस्थानसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत बंजारा भवन उभारण्याबरोबरच अन्य काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
बंजारा समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच नंगारा बोर्ड स्थापन करून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोहरादेवी येथे केली. बंजारा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्री संजय राठोड नेहमी धडपडत असतात. त्यांना हवी ती मदत केली जाईल. पोहरादेवी संस्थान विकासासाठी ५९३ कोटी रुपयांची निधी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. शिंदे म्हणाले की, वसंतराव नाईक महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही.
बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातूच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.नवी मुंबई येथे बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.