पुण्यातील दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराची खरी रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. कारण आज सर्वपक्षीय मोठे नेते या प्रचारात उतरणार आहेत.कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार सुरु होणार आहे. या निवडणूकीत भाजप विरोधात महाविकास आघाडी असा सरळ सामना होणार असल्याने गुरुवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.
आज सर्वपक्षीय मोठे नेते या प्रचारात उतरणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे देखील आज पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभही सकाळी साडेनऊ वाजता तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून सुरू केला जाणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज उपस्थितीत होणार आहेत.
महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी साडेनऊ वाजता ओंकरेश्वर मंदिर येथून केला जाणार असून, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढली जाणार आहे. तसेच चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रसारासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत विरोधी पक्षनेते अजित पवार दुपारी एक वाजता सहभागी होणार आहेत.
आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २६ फेब्रुवारीला या दोन्ही जागांसाठी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गज नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.