केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा कुठे आहे याबद्दल सांगणार नाही, नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी शिवसेना नेते करत आहेत. तसेच गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे कुठे आहेत, याबद्दल कोणालाही माहित नाही. यावर मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर नितेश राणे कुठे आहेत ते मला माहित नाही, आणि मी ते तुम्हाला का सांगू? आणि जरी मला माहीत असेल तरी मी सांगणार नाही. असे नारायण राणेंनी उत्तर दिले. यामुळे नारायण राणे यांना नितेश राणेसंदर्भात विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर आज युक्तीवाद अपूर्ण राहिल्यामुळे उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे.