Riya Aher: ‘नीट’ पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन रोखून अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेली तरुणी रिया अहेर हिच्या नशिबाने आता नवी कलाटणी घेतली आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ च्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत तिची वर्णी लागली आहे. मात्र, या शोच्या निर्मात्यांनी एका मोठ्या ट्विस्टची घोषणा केली असून रियाचा घरातील प्रवेश आता थेट प्रेक्षकांच्या मतदानावर अवलंबून असणार आहे. सूत्रसंचालक सलमान खानने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रोमोद्वारे या धक्कादायक निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे.
सलमान खानची ‘फॅन्स व्हर्डिक्ट’ची घोषणा; रिया अहेर विरुद्ध लव्ह गिल सामना
‘बिग बॉस 20’ च्या नव्या प्रोमोमध्ये सलमान खानने चाहत्यांना एक खास आणि शक्तिशाली अधिकार दिल्याचा खुलासा केला. घरातील सदस्याची निवड करण्याचा अधिकार थेट प्रेक्षकांना देताना सलमानने स्पष्ट केले की, रिया अहेर आणि लव्ह गिल या दोन चर्चेतील चेहऱ्यांपैकी एकालाच घरात प्रवेश मिळेल. प्रेक्षक जिओ सिनेमा किंवा हॉटस्टार ॲपवर जाऊन आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करू शकतात. ज्या स्पर्धकाला सर्वाधिक मते मिळतील, त्यालाच थेट घरात मुख्य स्पर्धक म्हणून स्थान दिले जाईल. या निर्णयामुळे रिया अहेरच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Inn dono ki kismat ab aapke haathon mein! ? Ab #FansKaFaisla decide karega #RhiyaAhir aur #LoveGill mein se kaun banega Bigg Boss 20 ka sadasya! Vote karo #JioHotstar app par. Voting lines close on 2nd September, 11:59 PM.#BiggBoss #BiggBossOnJioHotstar pic.twitter.com/p92Ya7FR2r — JioHotstar (@JioHotstar) August 25, 2026
पोलीस व्हॅन अडवण्यापासून ते ट्रोलिंगपर्यंतचा वादग्रस्त प्रवास
आंदोलनादरम्यान पोलीस गाडीसमोर धाडसाने उभे राहण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर रिया सोशल मीडिया सेन्सेशन बनली होती. या अचानक मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तिला मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रोलिंग आणि कथित धमक्यांनाही सामोरे जावे लागले. या त्रासाविरोधात तिने कायदेशीर तक्रारही दाखल केली होती. आंदोलनातील आक्रमक चेहऱ्यापासून ते मॉडेलिंग आणि अभिनयातील कारकिर्दीमुळे रियाची पार्श्वभूमी सध्या डिजिटल जगतात मोठ्या प्रमाणावर सर्च केली जात आहे. आता या वादग्रस्त आणि चर्चेतील प्रवासाच्या जोरावर ती रिॲलिटी शोच्या रंगमंचावर उतरण्यास सज्ज झाली आहे.
दरम्यान, 27 वर्षांच्या रिया अहेर हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. तिने विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात मानसशास्त्र विषयात प्रवेश घेतला होता; मात्र मॉडेलिंग आणि अभिनयाच्या संधींमुळे तिने तो अभ्यास अर्धवट सोडला. सध्या ती मुंबई विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेत आहे. रियाने तब्बल 13 वर्षे नाट्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले असून त्याचा फायदा तिला अँकरिंग आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये झाला. इन्स्टाग्रामवर 3 लाख 24 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली रिया नुकतीच ‘दिलबारा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली होती. आता बिग बॉसच्या घरात तिची एन्ट्री होणार की लव्ह गिल बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.