Vishal Garg Better Home Finance CEO removal 2026: चार मिनिटांच्या एका Zoom कॉलवरून तब्बल 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून जगभरात कुप्रसिद्ध ठरलेले भारतीय वंशाचे उद्योगपती विशाल गर्ग यांना आता स्वकीयांनीच मोठा झटका दिला आहे. 'Better Home & Finance' कंपनीच्या बोर्डाने विशाल गर्ग यांची कार्यकारी पदावरून उचलबांगडी केली आहे. या कारवाईनंतर गर्ग यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा (Board) राजीनामाही दिला असून, सध्या कंपनीच्या नेतृत्वात मोठा फेरबदल करण्यात आला आहे.
ख्रिसमसच्या तोंडावर 900 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी अन् जागतिक स्तरावर टीका
डिसेंबर 2021 मध्ये ख्रिसमसच्या अवघ्या काही आठवड्यांआधी गर्ग यांनी आयोजित केलेल्या एका Zoom बैठकीत कंपनीच्या एकूण 15 टक्के म्हणजे 900 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले होते. या कॉलचा व्हिडिओ व्हायरल होताच गर्ग यांच्या अत्यंत कठोर आणि निर्दयी कार्यशैलीवर जगभरातून कडाडून टीका झाली. या वादानंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते, तर गर्ग यांना काही काळासाठी पदावरून दूर होऊन माफी मागावी लागली होती.
'डेनियल लूइस यांनी केला पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार'; गर्ग यांचा खळबळजनक आरोप
पदावरून हटवल्यानंतर विशाल गर्ग यांनी हेज फंड मॅनेजर डेनियल लूइस यांच्यावर विश्वासघाताचा गंभीर आरोप केला आहे. गर्ग यांच्या दाव्यानुसार, कंपनीची रणनीती आणि खर्च कपातीचे कौतुक करून लूइस यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. 27 जुलै रोजी गर्ग यांनी लूइस यांना बोर्डात समाविष्ट केले, मात्र अवघ्या एका आठवड्यात लूइस यांनी इतर संचालकांना फितवून गर्ग यांची CEO पदावरून हकालपट्टी घडवून आणली आणि अंतरिम नेतृत्व स्वतःकडे घेतले.
दरवर्षी 1 डॉलर पगारावर काम करण्याची तयारी; पद मिळवण्यासाठी धडपड सुरू
CEO पद गमावल्यानंतर विशाल गर्ग यांनी सहजासहजी हार मानलेली नाही. कंपनीच्या नेतृत्वात पुन्हा परतण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध वकील अॅलेक्स स्पायरो यांची नियुक्ती केली आहे. तसेच Class B शेअर्सद्वारे विशेष मतदानाचे अधिकार असणाऱ्या प्रमुख भागधारकांचा पाठिंबा मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. बोर्डाकडे पुनर्नियुक्तीची मागणी करताना, कंपनी नफ्यात येईपर्यंत आपण वर्षाला अवघा 1 डॉलर पगार घेऊन काम करण्यास तयार असल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड चालवणारा CEO आता स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडतोय
काही वर्षांपूर्वी अवघ्या काही मिनिटांत 900 कुटुंबांचा रोजगार हिरावून घेणाऱ्या विशाल गर्ग यांच्यावर आता स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी बोर्डाची व भागधारकांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. एकेकाळी कंपनीवर पूर्ण वर्चस्व गाजवणारे गर्ग आता कायदेशीर लढाई आणि राजकीय रणनीतीच्या जोरावर पुन्हा कमबॅक करण्यासाठी धडपडत आहेत. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीमुळे कॉर्पोरेट जगतात 'Better Home & Finance' पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.