Indonesia Earthquake : इंडोनेशिया देशावर निसर्गाचा मोठा कोप झाला असून, शनिवारी लागोपाठ आलेल्या दोन विनाशकारी भूकंपांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. सकाळी रिश्टर स्केलवर 7.7 तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला, ज्याने देशात प्रचंड हाहाकार माजवला. या दुर्घटनेचे सावट कायम असतानाच दुपारी पुन्हा 6.5 तीव्रतेचा दुसरा मोठा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, दुपारी 4:24 वाजता (IST) आलेल्या या दुसऱ्या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली तब्बल 165 किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. एकापाठोपाठ झालेल्या या दोन तीव्र हादऱ्यांमुळे संपूर्ण इंडोनेशिया हादरून गेला असून, नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्सुनामीचा इशारा आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान
सकाळच्या वेळी फ्लोरेस किनारपट्टी भागात झालेल्या पहिल्या भूकंपानंतर प्रशासनाने नुसा तेंगारा क्षेत्रात तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक भागांतील रुग्णालये रिकामी करण्यात आली. सुदैवाने, नंतर हा धोका टळल्याने त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला. मात्र, भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे जीवित व वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. अनेक बहुमजली इमारती अवघ्या काही सेकंदांत पत्त्यांसारख्या कोसळल्या. रस्ते दुभंगले असून, वीज आणि दूरसंचार यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून, मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
जीवमुठीत धरून नागरिकांची पळापळ आणि भीषण वास्तव
या भीषण आपत्तीमध्ये आतापर्यंत किमान 40 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यांखाली अजूनही अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये कोसळणाऱ्या इमारती, धुळीचे लोट आणि जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा धावणारे नागरिक स्पष्ट दिसत आहेत. पहिल्या भूकंपाच्या धक्क्यातून लोक सावरत असतानाच आणि बचावकार्य सुरू असतानाच आलेला दुसरा झटका नागरिकांसाठी अत्यंत धडकी भरवणारा ठरला.
मदत आणि बचावकार्यात आव्हानांचा डोंगर
भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या नागेकेओ आणि आसपासच्या भागात दरडी कोसळल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत, ज्यामुळे आपत्कालीन बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक प्रशासनाकडून ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बाधित क्षेत्रांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असून, इंडोनेशियातील या दुहेरी आपत्तीमुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.