Ajay Devgn BMC Notice: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या आलिशान बंगल्यामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. मुंबईतील जुहू परिसरातील कपोळ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या देवगण कुटुंबाच्या मालमत्तेत चाललेल्या व्यावसायिक बांधकामावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘के-वेस्ट’ प्रभागाने ‘काम थांबवा’ (Stop Work) नोटीस बजावली आहे. या ठिकाणी सलून आणि स्पा सेंटर सुरू करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी अथवा परवाना देण्यात आला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सोसायटीच्या रहिवाशांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली असून, मालमत्ता मालकांकडून आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्याने हे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रहिवासी भागातील व्यावसायिक वापरावरून वाद पेटला
कपोळ हाऊसिंग सोसायटी ही पूर्णपणे निवासी क्षेत्र म्हणून वर्गीकृत आहे. त्यामुळे या बंगल्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यावर स्थानिक रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, देवगण कुटुंबाला या संदर्भात आधीच पत्र पाठवून कायदेशीर कागदपत्रांची मागणी केली होती; मात्र त्यांच्याकडून कोणताही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, हे प्रकरण सहकार विभागाच्या डेप्युटी रजिस्ट्रारपर्यंत गेले असून, त्यांनी यावर कायदेशीर सुनावणी सुरू केली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की, निवासी इमारतीमध्ये व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र किंवा परवानग्या सादर न केल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
देवगण टीमकडून सर्व परवानग्या असल्याचा दावा
दुसरीकडे, अजय देवगणच्या लीगल टीमने पालिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. देवगण कुटुंबाच्या मुख्य कायदेशीर सल्लागारांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित मालमत्तेच्या प्रस्तावित वापराबाबत आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या आणि मंजुऱ्या रितसर मिळवण्यात आल्या आहेत. या कायदेशीर नोटीशीला योग्य ते उत्तर देण्यासाठी देवगण यांच्या वकिलांनी पालिकेकडे 4 आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला आहे. दरम्यान, प्लंबिंग, इलेक्ट्रिक, पार्किंग, अग्निरोधक यंत्रणा आणि संरचनेत केलेल्या बदलांची सखोल तपासणी करण्याची मागणी सोसायटीने पालिकेकडे केली आहे.