Nepal Flood: नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी महापुराने हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. यातच रसुवा जिल्ह्यातील एका आईने आणि तिच्या 8 वर्षांच्या चिमुकल्याने अनुभवलेला थरार अंगावर काटा आणणारा आहे. माऊंट लँगटांग लिरुंगजवळील हिमनदीचा (ग्लेशियर) मोठा भाग तुटल्यामुळे चिखल, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोट खाली आला, ज्याने शाळा आणि बाजारपेठा पूर्णपणे गिळंकृत केल्या. या भयानक आपत्तीत आपल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असावा, या भीतीने 28 वर्षांची आई मैटी माया तामांग पूर्णपणे खचून गेली होती. मदत शिबिरांमध्ये दोन्ही मुलांचा शोध घेऊन थकल्यानंतर तिने त्यांना पुन्हा पाहण्याची आशा सोडली होती. मात्र, अशा अत्यंत कठीण प्रसंगात एका 8 वर्षांच्या बालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने एक अद्भूत चमत्कार घडवून आणला.
झाडाचा आश्रय अन् चिमुकल्याचे धाडस; असा वाचवला जीव
दरम्यान, बुधवारी सकाळी जोयल आणि त्याचा भाऊ नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. जोयल वर्गात अभ्यास करत असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र अंधार पसरला. पुराचे पाणी वेगाने वर्गात शिरत असल्याचे पाहून आठ वर्षांचा जोयल घाबरून न जाता आपल्या एका मित्रासोबत जवळच्या जंगलाच्या दिशेने धावला. पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या चिमुकल्याने थेट एका उंच झाडावर चढून आश्रय घेतला. त्याच्या पायाला आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या, तरीही त्याने हार मानली नाही. नंतर लष्कराच्या बचाव पथकाने त्याला तिथून सुरक्षितपणे एअरलिफ्ट करून नुवाकोट आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी काठमांडूच्या रुग्णालयात दाखल केले.
पत्रकाराच्या एका बातमीने आईला मिळाला पुनर्जन्म; हजारो मुले बाधित
रॉयटर्सच्या पत्रकाराने जेव्हा काठमांडूच्या रुग्णालयात जोयलची भेट घेतली आणि त्याच्या आईला मुलगा जिवंत असल्याचे सांगितले, तेव्हा तामांग यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. "माझा मुलगा जिवंत असल्याचे समजले तेव्हा मला माझे आयुष्यच परत मिळाल्यासारखे वाटले," अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली. नंतर तिचा लहान मुलगाही सुरक्षित आढळल्याने कुटुंबाची पुनर्भेट झाली. युनिसेफच्या माहितीनुसार, नेपाळमधील रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांत या पुरामुळे सुमारे 17,000 मुले बाधित झाली आहेत. सध्या सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांसारख्या बेपत्ता आणि दुरावलेल्या मुलांची नोंदणी करून त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे मदतकार्य राबवत आहेत.