Renuka Chowdhary On PM Modi: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘सदनात नाटक नव्हे, कामगिरी हवी’ या टिप्पणीवरून नवा वाद पेटला आहे. काँग्रेसने या विधानावर जोरदार प्रतिक्रिया नोंदवत सरकारवर प्रतिहल्ला चढवला आहे. पक्षाच्या खासदार रेणुका चौधरी यांनी तर थेट पंतप्रधानांवर बोट ठेवत म्हटले की, ‘नाटक’ हा शब्द ज्यांनी वापरला, तेच सर्वात मोठे नाटककार आहेत.
रेणुका चौधरींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
माध्यमांशी बोलताना चौधरी म्हणाल्या, “नाटक कसं आणि कधी करायचं याचं धडे आम्हालाच शिकवत आहेत. आम्ही मनापासून आणि जमिनीवर काम करणारे लोक. पण जे स्वतःच नाटकाचा मास्टरक्लास देतात, ते आम्हाला शिकवू लागले, याचं आश्चर्य वाटतं.” त्यांनी सरकारवर टीका करत सांगितलं की, संसद चालू असताना महत्त्वाच्या मुद्द्यांना दूर सारून फक्त विरोधकांवर आरोपांची नाट्यमय सादरीकरणे केली जात आहेत.
हेही वाचा – Pinarayi Vijayan: FEMA उल्लंघन प्रकरणात CM पिनराई विजयन अडचणीत; KIIFB वर 466 कोटींचा गंभीर आरोप
खरगे यांची प्रतिक्रिया
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी एक्सवर लिहिले की, “हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी लोकांच्या समस्यांवर बोलण्याऐवजी पुन्हा एकदा नाट्यरूपक सादर केले. संसदीय प्रक्रियेचा अवमान गेली 11 वर्षे सुरूच आहे.” खरगे यांनी आरोप केला की, अनेक महत्त्वाची विधेयके कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. शेतकरीविरोधी कायदे, GST आणि इतर महत्वाची विधेयके तातडीच्या नावाखाली घाईघाईत मंजूर केली गेली, असंही ते म्हणाले.
शीतकालीन सत्र के पहले दिन प्रधानमंत्री @narendramodi जी ने संसद के समक्ष मुख्य मुद्दों की बात करने के बजाय फ़िर से "ड्रामेबाज़ी की डिलीवरी" की है ! असलियत यह है कि संसदीय मर्यादा और संसदीय प्रणाली को पिछले 11 साल से सरकार ने लगातार कुचला है उसकी लंबी फेहरिस्त है । ? पिछले… — Mallikarjun Kharge (@kharge) December 1, 2025
खरगे म्हणाले की, देश बेरोजगारी, महागाई, आर्थिक असमानता, आणि लोकांच्या संसाधनांच्या लूटमारीच्या प्रश्नांनी त्रस्त आहे, पण सत्ताधारी पक्ष ‘नाटक’ या शब्दावरून राजकारण करत आहे. त्यांनी भाजपला इशारा दिला की, दिशाभूल करण्याचे डावपेच थांबवा. संसदेत लोकांच्या प्रश्नांची चर्चा करा. लोकशाही नाटकासाठी नाही, तर जनहितासाठी आहे.