Food Safety Dept. Raid: उत्तर प्रदेशातील हरदोई शहरातील सर्वात जुन्या अन् लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या 'मिर्चा राम स्वीट्स' या मिठाईच्या दुकानात ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात या दुकानातील अस्वच्छता आणि अत्यंत भयंकर परिस्थिती उघडकीस आली. पथकाने जेव्हा दुकानातील मिठाई थंड ठेवण्याचा फ्रिज उघडला, तेव्हा त्यांना आत चक्क जिवंत उंदीर फिरताना आढळले. वर्षानुवर्षे विश्वासाने मिठाई खरेदी करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या आरोग्याशी असा निष्काळजीपणा केला जात असल्याचे पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले.
काळी बुरशी, उघड्यावरील खवा आणि सिंथेटिक रंगांचा अतिरिक्त वापर
तपासणीदरम्यान दुकानाच्या स्वयंपाकघरात आणि स्टोअर रूममध्ये स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे उघड झाले. अन्न सुरक्षा अधिकारी शैलेन्द्र श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किचनच्या जमिनीवर साचलेले घाणेरडे पाणी, भिंतींवर काळी बुरशी आणि उघड्यावर ठेवलेला मैदा, साखर व खवा असा कच्चा माल आढळला. तयार मिठाईवर झाकण नसल्याने त्यावर माशांचा वावर होता, तसेच मिठाई आकर्षक बनवण्यासाठी असुरक्षित अशा सिंथेटिक रंगांचा सर्रास वापर केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रमुख पदार्थांचे नमुने जप्त; दुकान तात्काळ बंद करण्याचे आदेश
अन्न सुरक्षा अधिकारी ज्ञान प्रकाश सिंह पटेल यांनी सांगितले की, पथकाने घटनास्थळावरून रसमलाई, राजभोग, चमचम, पनीर आणि खवा अशा 5 महत्त्वाच्या खाद्यपदार्थांचे नमुने सील करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचा अधिकृत अहवाल येईपर्यंत आणि दुकानातील स्वच्छतेचे निकष पूर्ण होत नाही तोपर्यंत दुकान तात्काळ बंद ठेवण्याचे कडक आदेश प्रशासनाने दिले आहेत. अहवालात दोष आढळल्यास संबंधित मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
शहरातील ग्राहकांमध्ये तीव्र संताप; विश्वासाला तडा गेल्याची भावना
शहरातील एका नामांकित आणि जुन्या ब्रँडकडून असा प्रकार घडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हरदोईच्या नागरिकांमध्ये आणि नियमित ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.