Delhi Bomb Threats: देश 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असतानाच राजधानी दिल्ली आणि आसपासच्या एनसीआर परिसरात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या शासकीय इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब असल्याचे निनावी फोन व ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली. ऐतिहासिक लाल किल्ला आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 ला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांची तातडीने पळापळ झाली. याशिवाय जामनगर हाऊस, झंडेवालान इमारत, एमबी साकेत कार्यालय आणि दिल्ली कँटोनमेंट या संवेदनशील भागांतही तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळी दाखल झाली, मात्र प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
ई-मेलद्वारे खलिस्तानी संदर्भाने धमकी
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या एका धमकीच्या ई-मेलने प्रशासनाची चिंता आणखी वाढवली. या ई-मेलच्या विषयाच्या ओळीत "दिल्ली उच्च न्यायालयात दुपारी 2:11 वाजता बॉम्बस्फोट" असा स्पष्ट उल्लेख होता. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2:11 वाजता उच्च न्यायालयात, तर दुपारी 3:11 वाजता जिल्हा न्यायालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा दावा यात करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर 1984 च्या शीख विरोधी दंगलींचा आणि खलिस्तान चळवळीचा संदर्भ देत दिल्ली मेट्रोचे मार्ग आणि अंबालावरून येणाऱ्या प्रवासी गाड्यांनाही उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या गंभीर इशाऱ्यानंतर सर्वच न्यायालयांची आणि वाहतूक यंत्रणांची सुरक्षा तातडीने वाढवण्यात आली आहे.
हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण आणि पंतप्रधानांच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. कनॉट प्लेस, इंडिया गेट आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानक यांसारख्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षेची ही व्याप्ती शेजारील गुरुग्राम जिल्ह्यापर्यंत वाढवण्यात आली असून, तेथे वाहतूक नियंत्रण आणि नागरिक सुरक्षेसाठी सुमारे 4,500 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच शहराच्या सीमांवर 11 मुख्य तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. व्हीआयपी मार्ग, महत्त्वाचे रस्ते आणि वाहनतळांवर चोवीस तास बारीक लक्ष ठेवले जात आहे.