Four Sons Divide Parents: अमिताभ बच्चन यांच्या 2003 मधील गाजलेल्या 'बागबान' चित्रपटाची कथा खऱ्या आयुष्यात एखाद्या विचित्र वळणावर घेऊन जाईल असा कोणी विचारही केला नसेल. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद परिसरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयुष्यभर सोबत राहणाऱ्या वयस्क दाम्पत्याला त्यांच्या शेवटच्या वळणावर असताना एकमेकांपासून दूर नेणारा निर्णय त्यांच्याच मुलांनी घेतला. वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्यासाठी त्यांच्या 4 मुलांनीच त्यांची वाटणी केली. तब्बल 60 वर्षांपेक्षा अधिक काळ एकत्र संसार केलेल्या 85 वर्षीय पती आणि 80 वर्षीय पत्नी यांच्यात मुलांच्या या निर्णयामुळे काही काळानंतर दुरावा निर्माण झाला.
दुराव्यानंतर गैरसमज आणि वाद; 80 वर्षांच्या पत्नीची थेट घटस्फोटाची मागणी
मुलांच्या कराराप्रमाणे 2 मुलांनी आईची जबाबदारी स्वतःकडे घेतली, तर उर्वरित 2 मुलांनी वडिलांना आपल्यासोबत ठेवले. सुरुवातीला काही दिवस ही व्यवस्था चालू राहिली, परंतु वेगवेगळ्या घरांमध्ये राहिल्यामुळे पती-पत्नीमधील प्रत्यक्ष भेटी दुरापास्त झाल्या. केवळ फोनवरून होणाऱ्या संवादातून दोघांमध्ये गैरसमज पसरले आणि वादाची ठिणगी पडली. हा दुरावा आणि कडवटपणा इतका विकोपाला गेला की, 80 वर्षांच्या वृद्ध पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठून आपल्या 85 वर्षांच्या पतीकडून घटस्फोटाची मागणी केली.
पोलीस आणि महिला सल्ला केंद्राकडून समुपदेशनाचा प्रयत्न
इतक्या वृद्धापकाळात घटस्फोटाची मागणी ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. हे प्रकरण तातडीने महिला परामर्श (सल्ला) केंद्राकडे वर्ग करण्यात आले. तिथे समुपदेशकांनी दोन्ही वृद्धांशी चर्चा करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे आणि मतभेद मिटवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, दोघांच्याही मनातील कडवटपणा इतका वाढला होता की, त्यांनी पुन्हा एकत्र राहण्यास पूर्णपणे नकार दिला. अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एका मधल्या मार्गाचा अवलंब केला.
दरमहा पोटगी देण्यावर झाला तोडगा; कायद्याच्या मध्यस्थीने प्रकरणावर पडदा
महिला सेलच्या प्रभारी अलका चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने आपल्या वृद्ध पत्नीच्या दैनंदिन खर्चासाठी दरमहा ठराविक रक्कम (पोटगी) देण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही बाजूंच्या सहमतीने या वादावर कायदेशीर तोडगा काढण्यात आला असून लवकरच या प्रकरणाचा पूर्ण निपटारा केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुलांच्या एका निर्णयामुळे आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध दांपत्याची झालेली ही मानसिक स्थिती विचार करायला लावणारी आहे.