Shravan Month and Shravan Somvar: सनातन धर्मात अतिशय पवित्र आणि मंगलमय मानला जाणारा श्रावण महिना सुरू झाला आहे. गुरुवारी, 13 ऑगस्ट 2026 पासून या भक्तिमय महिन्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत निसर्गात पसरलेली हिरवळ आणि भक्तिमय वातावरण यामुळे श्रावण हा अध्यात्म आणि निसर्गाचा एक सुंदर संगम मानला जातो. पंचांगानुसार, यंदाचा हा पवित्र महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होऊन 11 सप्टेंबर 2026 रोजी समाप्त होणार आहे. या संपूर्ण काळात भगवान शंकराची उपासना, व्रतवैकल्ये आणि ध्यानाला विशेष प्राधान्य दिले जाते.
भगवान महादेवांचा प्रिय महिना; शिवभक्तीचा रंग उधळणार
श्रावण महिना हा भगवान महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो, त्यामुळे या काळात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या संपूर्ण महिन्यात अनेक भाविक उपवास ठेवून महादेवाची आराधना करतात आणि शिवलिंगावर जलाभिषेक तसेच बेलपत्र अर्पण करतात. भगवान शिवाला प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. यंदा 13 ऑगस्टपासून श्रावण सुरू होत असल्याने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रावणी सोमवारांचे विशेष धार्मिक महत्त्व अन् व्रत
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. या दिवशी मनापासून उपवास करून महादेवाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी दृढ श्रद्धा आहे. म्हणूनच श्रावणी सोमवाराला हिंदू परंपरेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी शिवलिंगावर विशेष शिवामूठ वाहण्याची आणि रुद्रपूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते.
– 2026 च्या श्रावण महिन्यात किती सोमवार येतील?
2026 वर्षात श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार असतील. या काळात अनेक भाविक या सोमवारी उपवास करतात आणि भगवान शिवाची विशेष प्रार्थना करतात.
पहिला सोमवार: 17 ऑगस्ट
दुसरा सोमवार: 24 ऑगस्ट
तिसरा सोमवार: 31 ऑगस्ट
चौथा सोमवार: 7 सप्टेंबर
– प्रत्येक श्रावणी सोमवारची शिवामूठ
महाराष्ट्रातील प्रचलित परंपरेनुसार श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर वेगवेगळ्या धान्याची एक मूठ अर्पण केली जाते, याला शिवामूठ किंवा शिवमुष्टीव्रत म्हणतात.
पहिला सोमवार – तांदूळ
दुसरा सोमवार – तीळ
तिसरा सोमवार – मूग
चौथा सोमवार – गहू
हेही वाचा – Shravan 2026 Wishes In Marathi: ॐ नमः शिवाय! श्रावणमासानिमित्त प्रियजनांना पाठवा सुंदर शुभेच्छा संदेश
11 सप्टेंबरपर्यंत चालणार सणांची रेलचेल
13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत येणाऱ्या या श्रावण महिन्यात सण आणि व्रतांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे. मंगळागौरीचे पूजन, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी यांसारखे महत्त्वाचे सण याच महिन्यात अतिशय उत्साहात साजरे केले जातात. धार्मिक विधी आणि उपवासांच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी हा महिना शिवभक्तांसाठी एक सुवर्णसंधी मानला जातो.
– श्रावणातील प्रमुख सण
श्रावणी सोमवार
नागपंचमी
पुत्रदा एकादशी
रक्षाबंधन
नारळी पौर्णिमा
श्रावणी पौर्णिमा
गोकुळाष्टमी (काही पंचांगांनुसार भाद्रपदात)
हेही वाचा – Wearing Green Bangles In Shravan : हिरव्या बांगड्या फक्त परंपरा नाही! श्रावणात घालण्यामागे आहे 'हे' खास कारण