मुंबई: देशांतर्गत शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या जागतिक तणावाच्या भीतीमुळे बाजारावर दबाव वाढला असून, प्रमुख निर्देशांक लाल निशाण्यावर आहेत. बीएसई सेन्सेक्स तब्बल 950 अंकांनी घसरत 73150 पातळीवर पोहोचला आहे, तर निफ्टी 50 288 अंकांच्या घसरणीसह 22680 वर व्यवहार करत आहे.
मंगळवारी दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवशी बाजाराची सुरुवातच नकारात्मक झाली. सेन्सेक्स सुमारे 700 अंकांनी घसरत 73400 वर उघडला, तर निफ्टी 180 अंकांनी खाली येत 22780 च्या आसपास उघडला. याचवेळी बँक निफ्टीमध्येही मोठी घसरण नोंदवली गेली असून तो सुमारे 550 अंकांनी घसरून 48900 च्या पातळीवर पोहोचला आहे.
या घसरणीमागील प्रमुख कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ खुली करण्याची डेडलाइन. या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव वाढताना दिसत आहे. युद्धाच्या शक्यतेने बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आशियाई बाजारांमध्ये मात्र मिश्र संकेत दिसून आले. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.35 टक्क्यांनी वाढला, तर टॉपिक्समध्ये 0.62 टक्क्यांची वाढ झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 1.5 टक्क्यांनी वधारला, तर कोस्डॅकमध्येही वाढ दिसली. ईस्टर सुट्टीमुळे हाँगकाँगचे बाजार बंद होते.
अमेरिकन बाजारातही सावध वातावरण दिसून आले. S&P 500 आणि Nasdaq 100 फ्युचर्समध्ये किरकोळ घसरण झाली, तर Dow Jones फ्युचर्समध्ये अल्प वाढ दिसली. जागतिक बाजारात गुंतवणूकदार ट्रम्प यांच्या भूमिकेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने, त्यासंदर्भातील कोणतीही अडचण बाजारासाठी धोकादायक ठरू शकते.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही वाढ नोंदवली गेली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 113 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला असून, ब्रेंट क्रूडही 110 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम शेअर बाजारावरही होत आहे.
एकूणच, जागतिक राजकीय तणाव, कच्च्या तेलातील तेजी आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय घडामोडींवरच बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)