Munich Airport Tail Strike : उड्डाणादरम्यान विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळला; 271 प्रवासी अन् 16 कर्मचारी…

हनोईच्या दिशेने झेपावलेल्या 'व्हिएतनाम एअरलाइन्स'च्या विमानाचा मागील भाग (Tail) टेक-ऑफदरम्यान अचानक धावपट्टीवर जोरदार आदळला. या भीषण प्रसंगाने विमानात एकच खळबळ उडाली.

Munich Airport Tail Strike : उड्डाणादरम्यान विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळला; 271 प्रवासी अन् 16 कर्मचारी…

Munich Airport Tail Strike :  जर्मनीतील म्युनिक आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 ऑगस्ट रोजी एका मोठ्या संभाव्य दुर्घटनेतून शेकडो प्रवासी थोडक्यात वाचले. हनोईच्या दिशेने झेपावलेल्या 'व्हिएतनाम एअरलाइन्स'च्या विमानाचा मागील भाग (Tail) टेक-ऑफदरम्यान अचानक धावपट्टीवर जोरदार आदळला. या भीषण प्रसंगाने विमानात एकच खळबळ उडाली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मोठा अनर्थ टळला.

हवेतच इंधन सोडून 2 तास घातल्या घिरट्या

विमानाच्या मागील भागाला फटका बसल्यानंतर सुरक्षित लँडिंग करणे आव्हानात्मक होते. त्यामुळे अपघात टळावा आणि विमानाचे वजन कमी व्हावे यासाठी वैमानिकाने हवेतच इंधन सोडून देण्याचा (Fuel Dumping) मार्ग अवलंबला. म्युनिक शहराच्या वर सुमारे 9,000 फूट उंचीवर हे विमान तब्बल 2 तास घिरट्या घालत राहिले. इंधनाचा साठा सुरक्षित पातळीवर आल्यानंतरच वैमानिकाने म्युनिक विमानतळाकडे लँडिंगचा मार्ग स्वीकारला.

271 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्स सुखरूप

स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता व्हिएतनाम एअरलाइन्सचे 'VN-34' (बोईंग 787-9) हे विमान म्युनिकहून हनोईसाठी रवाना झाले होते. उड्डाण घेताना धावपट्टीवरून मोठा आवाज झाला आणि विमानाचा मागील भाग आदळल्याने धुळीचे लोट हवेत पसरले. या विमानात एकूण 271 प्रवासी आणि 16 कर्मचारी (Crew Members) प्रवास करत होते. सर्व प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती व्हिएतनामच्या अधिकृत यंत्रणांनी दिली आहे. सुरुवातीला तांत्रिक अडचणीचे कारण सांगण्यात आले असले तरी धावपट्टीवरील आदळण्यामुळेच हा आपत्कालीन प्रसंग निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – Donald Trump: 'भारतासारखी पारदर्शकता अमेरिकेतही हवी…'; ट्रम्प यांच्याकडून भारतीय मतदान प्रक्रियेचे कौतुक

उत्तर धावपट्टी बंद; हवाई सेवेवर परिणाम

या घटनेनंतर सुरक्षा उपायांचा भाग म्हणून म्युनिक विमानतळ प्रशासनाने आपली उत्तर धावपट्टी (North Runway) तात्काळ बंद केली. विमानाने दक्षिण धावपट्टीवरून उड्डाण केले होते, परंतु आपत्कालीन स्थितीत ते उत्तर धावपट्टीवर उतरवण्यात आले. धावपट्टी बंद ठेवल्यामुळे अनेक इतर विमानांच्या उड्डाणांवर आणि लँडिंगवर विपरित परिणाम झाला असून हवाई प्रवासाला विलंब झाला.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number