पुरी : ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या गर्दीच्या रेटारेटीत एका भाविकाचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रथयात्रेच्या उत्साहाला गालबोट लागले असून प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले.दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथयात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक पुरीमध्ये दाखल झाले होते. पारंपरिक ‘पहांडी’ विधी पूर्ण झाल्यानंतर ग्रँड रोड परिसरात मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले. याचवेळी अचानक गर्दी वाढल्याने काही भाविकांचा तोल गेला आणि काही क्षणांतच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याच्या मागील भाविकांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक जण एकमेकांवर पडले आणि परिसरात धावपळ सुरू झाली. घटनास्थळी तैनात पोलीस आणि स्वयंसेवकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना सुरक्षित बाहेर काढले.या घटनेत 60 वर्षीय एका भाविकाचा मृत्यू झाला. गर्दीच्या रेटारेटीत ते बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.याशिवाय, 100 हून अधिक जखमी भाविकांना पुरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयासह विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून काहींवर गंभीर उपचार सुरू आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय पथके सतत उपचार करत आहेत.