Protest in Khandwa Collectorate Wearing Dog Costume: जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरलेल्या जनसुनावणीत एक अत्यंत चित्रविचित्र आणि अभूतपूर्व देखावा पाहायला मिळाला. शहरातील वाढता मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आणि नगरपालिकेच्या संशयास्पद कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका तरुणाने थेट कुत्र्यासारखा दिसणारा पोशाख आणि मुखवटा परिधान करून जनसुनावणी कक्षात प्रवेश केला. या तरुणाच्या अजब आंदोलनाचे चित्रीकरण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथे हा प्रकार घडला. खंडवा नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक मुल्लू राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कागदोपत्री नसबंदीचा दावा; 40 लाखांचे बिल मंजूर होऊनही 13,225 नागरिकांना चावा
या अनोख्या आंदोलनाद्वारे पालिका प्रशासनामधील कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आली आहे. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडवा नगरपालिकेने भटक्या श्वानांच्या नसबंदी मोहिमेसाठी तब्बल 40 लाख रुपयांचे बिल कागदोपत्री मंजूर करून घेतले आहे. परंतु, प्रत्यक्षात नसबंदीची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी झाली नसून हा केवळ एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिकेच्या या दुर्लक्षामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या घटण्याऐवजी प्रचंड वाढली असून, आतापर्यंत तब्बल 13,225 नागरिकांना आणि लहान मुलांना श्वानांनी चावा घेतल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेत्यांचा पालिकेवर हल्लाबोल; कंत्राटदार कंपनीवर कारवाईची जोरदार मागणी
‘नगरपालिकेने जनतेच्या कराचे लाखो रुपये नसबंदीच्या कंत्राटावर उधळले तरीही रस्त्यावरील श्वानांचा धोका कायम आहे,’ असा थेट घणाघात विरोधी पक्षनेते दीपक मुल्लू राठोड यांनी केला. ज्या खाजगी कंपनीला नसबंदीचे कंत्राट देण्यात आले होते, तिच्या कामात अत्यंत गंभीर त्रुटी आणि गैरव्यवहार झाले आहेत. या बनावट कामाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यासाठीच अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी हे आंदोलन उभारावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले.
Man Wearing Dog Costume Reaches Khandwa Collectorate to Protest Stray Dog Menace in Madhya Pradesh. pic.twitter.com/P5tNXJrFjl — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 19, 2026
जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन; दोषी आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा
या विचित्र आंदोलनाची आणि तक्रारीची जिल्हा प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने दखल घेतली आहे. याप्रकरणी माहिती देताना खंडवाचे अप्पर जिल्हाधिकारी काशीराम बडोले म्हणाले की, ‘नसबंदी न करताच 40 लाख रुपयांचे बनावट बिल काढल्यासंदर्भात नागरिकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. या विषयावर महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली असून आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’ चौकशीअंती गैरव्यवहार अथवा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास जबाबदार घटकांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.