LPG Gas New Rules: देशभरात स्वच्छ इंधनाचा योग्य पुरवठा करण्यासाठी आणि गॅस सिलिंडरचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी सरकारने तेल कंपन्यांच्या (IOCL, BPCL, HPCL) सहकार्याने नियमावलीत मोठे बदल केले आहेत. आता 'एका घरासाठी एक गॅस जोडणी' (One Home, One Gas Connection) या नियमाची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जात आहे. याच अंतर्गत घरगुती LPG आणि PNG धारकांसाठी 30 ते 90 दिवसांचे विशेष कालमर्यादा नियम जाहीर करण्यात आले आहेत. ग्राहकांना कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी हे नवे बदल समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
काय आहे 'एक घर, एक गॅस जोडणी' मोहीम?
सिलिंडरची बेकायदेशीर साठेबाजी आणि काळ्या बाजाराला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. नव्या धोरणानुसार, एकाच निवासी पत्त्यावर किंवा एकाच रेशन कार्डवर एकापेक्षा जास्त LPG कनेक्शन ठेवता येणार नाहीत. एकाच घरात एकापेक्षा जास्त सिलिंडरचा वापर करून होणारे व्यावसायिक रिफिलिंग आणि इतर गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
काय आहेत 30 आणि 90 दिवसांचे नवे नियम?
पाईप गॅस (PNG) आणि LPG सिलिंडर दोन्ही वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आता मुदत निश्चित करण्यात आली आहे. जर तुमच्या घरात नवीन PNG गॅस जोडणी सुरू झाली असेल, तर पुढील 30 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे जुने LPG सिलिंडर कनेक्शन एकतर गॅस एजन्सीकडे सुपूर्द (सरेंडर) करावे लागेल किंवा ते स्थगित (होल्ड) करावे लागेल. PNG सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असून, असे न केल्यास ग्राहक कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.
25 आणि 45 दिवसांचे बंधन
गॅस वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वीही बुकिंगच्या कालावधीत मर्यादा आणल्या होत्या. जुन्या नियमांनुसार, ग्राहकांना पहिले सिलिंडर मिळाल्यानंतर पुढील 25 दिवसांच्या आत दुसरे सिलिंडर बुक करण्याची परवानगी नव्हती. तसेच, अनुदानित (सबसिडी असलेल्या) गॅसचा तुटवडा भासू नये आणि सर्वांना समान प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी दोन सिलिंडरच्या वितरणात किमान 45 दिवसांचे अंतर ठेवण्याच्या प्रस्तावावरही पूर्वी विचार करण्यात आला होता.
नियमांचे उल्लंघन केल्यास गॅस जोडणी होणार रद्द आणि सबसिडी बंद
नव्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाईची टांगती तलवार आहे. ठरवून दिलेल्या 90 दिवसांच्या मर्यादेत जर ग्राहकांनी अतिरिक्त किंवा अनधिकृत गॅस कनेक्शनची माहिती दिली नाही, तर तेल कंपन्यांकडून त्यांचे कनेक्शन कायमचे ब्लॉक केले जाऊ शकते. याशिवाय, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सरकारी सबसिडी त्वरित थांबवली जाईल आणि त्यांना मोठा आर्थिक दंडही सोसावा लागू शकतो.
हेही वाचा – Telegram: टेलिग्राम पुन्हा संकटात! बंदी उठल्यानंतरही अॅप काम करत नाही? जाणून घ्या कारणं
संभाव्य कारवाई टाळण्यासाठी त्वरित करा e-KYC आणि इतर प्रक्रिया
कोणताही मनस्ताप किंवा अडचण टाळण्यासाठी ग्राहकांनी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे:
कनेक्शन सरेंडर किंवा ट्रान्सफर करा: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्यास, अतिरिक्त कनेक्शन जवळच्या गॅस एजन्सीमध्ये (Indane, HP किंवा Bharat Gas) जाऊन जमा करा किंवा ते दुसऱ्या पत्त्यावर राहणाऱ्या नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरित करा.
e-KYC पूर्ण करणे अनिवार्य: सध्या वापरत असलेले गॅस कनेक्शन कायदेशीररीत्या सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपली बायोमेट्रिक किंवा ऑनलाइन e-KYC प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करणे आवश्यक आहे.