N Chandrasekaran Resigns : टाटा समूहात नेतृत्वाच्या बदलाची नांदी; एन. चंद्रशेखरन यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पण 2027 पर्यंत…

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, ही जबाबदारी ते तत्काळ सोडणार नाहीत.

N Chandrasekaran Resigns : टाटा समूहात नेतृत्वाच्या बदलाची नांदी; एन. चंद्रशेखरन यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पण 2027 पर्यंत…

N Chandrasekaran Resigns :  भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि अग्रगण्य औद्योगिक समूह असलेल्या 'टाटा समूहा'त सर्वोच्च पातळीवर मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळाले आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, ही जबाबदारी ते तत्काळ सोडणार नसून फेब्रुवारी 2027 मध्ये त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपेपर्यंत ते या अध्यक्षपदाचे कामकाज पाहणार आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर आता टाटा समूहाचा पुढील वारसदार किंवा उत्तराधिकारी कोण असणार, याविषयीच्या चर्चांना भारतीय कॉर्पोरेट जगतात उधाण आले आहे.

चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ आणि विविध क्षेत्रांतील विस्तार
एन. चंद्रशेखरन यांनी जानेवारी 2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी समूहातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. गेल्या दशकात त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली टाटा समूहाने आपल्या पारंपारिक व्यवसायांसोबतच अनेक आधुनिक आणि नव्या दमाच्या क्षेत्रांमध्ये वेगाने पाऊल ठेवले. चंद्रशेखरन यांच्या काळात सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी निर्मिती, विमानसेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि संरक्षण उत्पादन अशा धोरणात्मक क्षेत्रांत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. विशेषतः 'एअर इंडिया'ची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे मिळवणे हा त्यांच्या कार्यकाळातील सर्वात ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय मानला जातो.

18 ऑगस्टच्या एजीएमपूर्वी राजीनाम्याची घोषणा
टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 18 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत संचालक मंडळातील सदस्य म्हणून चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार होती. टाटा सन्सच्या नियमांनुसार अध्यक्षांचे पद हे थेट संचालक मंडळाच्या सदस्यत्वाशी जोडलेले असल्यामुळे ही बैठक अत्यंत कळीची मानली जात होती. बैठकीच्या अवघ्या काही दिवस आधीच त्यांनी राजीनाम्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. टाटा समूहाने अद्याप नव्या अध्यक्षांच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, ज्यामुळे फेब्रुवारी 2027 नंतर या बलाढ्य समूहाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टाटा ट्रस्टसोबतचे मतभेद आणि आर्थिक कामगिरी
चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांच्यात काही धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याची चर्चा वेळोवेळी समोर आली होती. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा सुमारे 66 टक्के इतका मोठा हिस्सा आहे. नव्या व्यवसायातील प्रचंड गुंतवणूक, भांडवलाची गरज आणि समूहाची भविष्यातील दिशा यांवर दोन्ही बाजूंची मते भिन्न असल्याचे मानले जात होते.

हेही वाचा – Sourav Ganguly : सौरव गांगुली आणि पत्नी डोना कोणाच्या हिटलिस्टवर? महिनाभरापासून येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

दुसरीकडे, चंद्रशेखरन यांच्या काळात टाटा सन्सची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा 21.8 टक्क्यांनी वाढून 31,961 कोटी झाला, तर एकूण महसूल 9.1 टक्क्यांनी वाढून 42,366.55 कोटींच्या टप्प्यावर पोहोचला. एअर इंडियासारख्या उपक्रमांमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे सुरुवातीला तोटा वाढला असला, तरी समूहाच्या भविष्यासाठी ही दीर्घकालीन धोरणात्मक पावले आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number