मराठी कलाकारांचे मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भरभरून कौतुक होते. आपल्या कलाकारांचं मूळ थिएटरमध्ये असल्याने त्यांच्या अभिनयाला विशेष किनार असल्याचे बोबले जाते. त्यामुळे इथे अभिनेता केवळ नायकाचीच भूमिका साकारत नसून कधी खलनायक, कधी विनोदी अभिनेता, तर कधी चकीत करणाऱ्या वैक्तिरेखादेखील सहज साकारतो. ते मराठी अभिनेत्रींसाठीही लागू होते. मराठी कलाकार स्वतःला कोणत्याही चाकोरीत बांधून ठेवत नाहीत. असाच एक वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा कलाकार आपल्याला लाभला आहे. तो म्हणजे ललित प्रभाकर.
ललित प्रभाकरने २०१७ साली चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यापूर्वी २००८ पासून त्याने काही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र त्याला खरी ओळख मिळाली, ती जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील आदित्यच्या व्यक्तिरेखेमुळे. प्रेमळ, समजून घेणारा, संयमी अशा आदित्यला घरांघरांतून प्रेम मिळू लागले. ललितने काही नाटकांमध्ये तसेच काही वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
नुकताच प्रहार या हिंदी सिनेमाचा टिझर सोशल मीडियावर लाँच झाला आहे. भारताचे नामवंत वकिल उज्ज्व निकम यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे २६/११ या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यावर याचे कथानक बेतलेले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे वेगळेच महत्त्व निर्माण होत असून भारतीयांच्या भावनाही याच्याशी जोडल्या जातील. अशातच चित्रपटामध्ये मुख्य आरोपी आणि दहशतवादी अजमल कसाब याची भूमिका अभिनेता ललित प्रभाकरने साकारली आहे. एका दहशतवाद्याची भूमिका साकारणे हे नक्कीच त्याच्यासाठी आव्हानात्मक राहिले असेल. २६/११ हा भारतातील सर्वात मोठा दहशवादी हल्ला मानला जातो. तब्बल ४ दिवस सुरू असलेल्या या चकमकीत दहा पैकी ९ दहशतवाद्यांना ठार करण्यात मुंबई पोलीस, आर्मी, फोर्स यांना यश आले होते. तर एकमेव दहशतवाद्याल जीवंत पकडण्याची कामगिरी मुंबई पोलिसांनी केली होती. भारतावर हल्ला करणाऱ्याला त्याचवेळी जीवंत पकडणे हे आपलं मोठ यश मानलं जातं होतं. दरम्यान, कसाबसाठी देशवासियांच्या मनात अजूनही द्वेष आहे. त्यामुळे मुंबईकरांवर बेभान होऊन गोळ्या झाडणारा, बेदारकपणे कोर्टात स्वतःची बाजू मांडणार आणि आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसणारा कसाब ललित प्रभाकर कसा साकारतो, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. प्रहार चित्रपटात अभिनेता राजकुमार राव याने उज्ज्वल निकम यांनी भूमिका साकारली असून हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
ललितच्या आणखी एका चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. तो म्हणजे विद्रोही साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारीत ढसाळ या चित्रपटाची. मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक. तसेच दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या ढसाळ यांच्या भूमिकेला ललित कसा न्याय देतो, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर लाँच नुकतेच झाले असून हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अजमल कसाब आणि ढसाळ या दोन्ही विरूद्ध टोकाच्या भूमिका असून ललित प्रभाकर त्या नक्कीच प्रभावीपणे साकारेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.