Swami Avimukteshwaranand Saraswati: कथित लैंगिक अत्याचार आणि शोषणाच्या गंभीर आरोपांखाली अडकलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने या दोघांच्याही अटकपूर्व जामीन याचिका मंजूर केल्या असून, त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. न्यायमूर्ती जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या एकल-न्यायाधीश खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. 27 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता, जो आज जाहीर करण्यात आला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रयागराजमधील झुसी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी न्यायालयात धाव घेऊन कलम 173(4) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या अर्जाची दखल घेत स्थानिक न्यायालयाने पोलिसांना एफआयआर (FIR) नोंदवण्याचे निर्देश दिले होते. या कायदेशीर कारवाईमुळे अटकेची शक्यता निर्माण झाल्याने स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांच्या शिष्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयीन प्रक्रिया आणि दिलासा
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि मुकुंदानंद गिरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर निर्माण झालेला अटकेचा पेच आता या निकालामुळे सुटला आहे. दरम्यान, तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपासाच्या प्रक्रियेत स्वामींना तात्पुरते संरक्षण मिळाले आहे.