Pilot Drug Testing: फुकेत-दिल्ली विमानाच्या उड्डाणादरम्यान घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर एअर इंडियाने आपल्या सर्व वैमानिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या विमानाचे मुख्य वैमानिक मारिजुआना (गांजा) या अमली पदार्थाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने आता आपल्या सर्व वैमानिकांची अमली पदार्थांच्या सेवनाबाबत अनिवार्य तपासणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हवेत 300 फूट खाली आलं होतं विमान
4 ऑगस्ट रोजी फुकेत-दिल्ली दरम्यान उड्डाण करणारे 'AI2379' हे विमान हवेत असताना अचानक 300 फूट खाली आले. या भीषण धक्क्यामुळे विमानातील चार क्रू सदस्यांसह 24 प्रवासी जखमी झाले. सुरुवातीला कंपनीने याचे कारण 'टर्ब्युलन्स' असल्याचे सांगितले होते. मात्र, दिल्लीत विमान उतरल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत मुख्य वैमानिक अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
13 ऑगस्टपासून सर्व वैमानिकांची चाचणी अनिवार्य
या घटनेची गंभीर दखल घेत एअर इंडियाने गुरुवारी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे नवीन नियमांची माहिती दिली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांच्याही पुढे जाऊन सुरक्षेची सर्वोच्च मानके जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ऑगस्ट 2026 पासून समूहातील सर्व वैमानिकांची अमली पदार्थ आणि प्रतिबंधित औषधांसाठी पूर्ण तपासणी सुरू झाली आहे. ही तपासणी गुरुग्राम अकादमी, फ्लाईट ब्रीफिंग सेंटर्स किंवा कंपनीच्या कार्यालयांमध्ये केली जाईल.
वैमानिक कर्तव्यावरून निलंबित
संबंधित दोषी वैमानिकाला चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. या घटनेचे वर्गीकरण 'गंभीर घटना' असे करण्यात आले असून, 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) द्वारे याची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेले दोन क्रू सदस्य सध्या रुग्णालयात उपचाराधीन आहेत. प्रवाशांचा विश्वास आणि सुरक्षा हीच आमची सर्वात मोठी संपत्ती असून, तिच्या रक्षणासाठी कडक पावले उचलली जात असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.