Mahatma Gandhi: महात्मा गांधींच्या 688 हस्तलिखित विचारांच्या संग्रहाचा नवा विक्रम; लिलावात लागली 16.20 कोटींची बोली

हा दुर्मिळ संग्रह भारतामधीलच एका खरेदीदाराने घेतला असून, हे ऐतिहासिक दस्तऐवज देशामध्येच राहणार असल्याचे लिलाव संस्थेने स्पष्ट केले आहे.

Mahatma Gandhi: महात्मा गांधींच्या 688 हस्तलिखित विचारांच्या संग्रहाचा नवा विक्रम; लिलावात लागली 16.20 कोटींची बोली

Mahatma Gandhi Manuscript Auction: महात्मा गांधी यांच्या अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ हस्तलिखिताच्या संग्रहाने भारतीय ऐतिहासिक दस्तऐवजांच्या लिलावात नवा इतिहास रचला आहे. सफ्रोनआर्टच्या लिलावात महात्मा गांधींच्या 688 स्वाक्षरीयुक्त विचारांचा संग्रह तब्बल 16.20 कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा दुर्मिळ संग्रह भारतामधीलच एका खरेदीदाराने घेतला असून, हे ऐतिहासिक दस्तऐवज देशामध्येच राहणार असल्याचे लिलाव संस्थेने स्पष्ट केले आहे. एका अज्ञात बोलीदाराने ही विक्रमी बोली लावून हा संग्रह आपल्या नावे केला.

स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीजींचे जवळचे सहकारी आनंद टी. हिंगोराणी यांच्या पत्नी विद्या यांच्या निधनानंतर, त्यांचे सांत्वन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी गांधीजींनी सलग दोन वर्षे हे दररोजचे विचार लिहिले होते. गांधीजींनी 1944 ते 1946 या कालावधीत रोज लिहिलेले हे संदेश पुढे 'अ थॉट फॉर द डे' या पुस्तकाच्या रूपात संकलित करण्यात आले. हिंगोराणी यांची 1930 मध्ये गांधीजींशी भेट झाली होती आणि त्यांनी साबरमती आश्रमात काम केले होते. याशिवाय त्यांनी दांडी यात्रा, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता.

संग्रहातील प्रमुख आकर्षणे आणि लिलावाची रक्कम
सफ्रोनआर्टतर्फे आयोजित 'गांधी: फ्रॉम द कलेक्शन ऑफ आनंद टी. हिंगोराणी' या लिलावात गांधीजींच्या पत्रांचा, फोटोंचा, हस्तलिखितांचा आणि वैयक्तिक वस्तूंचा समावेश होता. यामध्ये एकूण 86 लॉट्स लिलावासाठी ठेवण्यात आले होते. या लिलावातील इतर प्रमुख वस्तू आणि त्यांना मिळालेली किंमत खालीलप्रमाणे आहे.
– गांधीजींच्या ईश्वर आणि भगवद्गीतेवरील विचारांशी संबंधित तीन हस्तलिखितांचा संच 1.68 कोटी रुपयांना (176,842 अमेरिकन डॉलर) विकला गेला.
– सूत कातण्याच्या आध्यात्मिक शिस्तीवर लिहिलेल्या दोन पत्रांसह गांधीजींचा 'पेटी चरखा' 1.02 कोटी रुपयांना (107,368 अमेरिकन डॉलर) लिलावात गेला.
– गांधीजी काहीतरी लिहित असतानाची त्यांची स्वाक्षरी असलेली एक दुर्मिळ छायाचित्र प्रत 78 लाख रुपयांना (82,105 अमेरिकन डॉलर) विकली गेली.
– आर्थिक स्वातंत्र्यावर भर देणारी पत्रे, तारा आणि पोस्टकार्ड्सचा संच 57.60 लाख रुपयांना (60,632 अमेरिकन डॉलर) विकला गेला.

हेही वाचा – Gold-Silver Rate : सणासुदीच्या काळात चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक! चांदीच्या दरात 10 हजारांची उसळी, तर सोन्याचे दर 6 हजारांनी…

सत्य आणि अहिंसेवर गांधीजींच्या जीवनमूल्यांचा पट
दशकांपासून हिंगोराणी कुटुंबाने जतन करून ठेवलेला हा संग्रह गांधीजींच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा एक अत्यंत जवळचा दृष्टिकोन सादर करतो. लिलाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या संग्रहात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निवारण, रामनाम, कर्तव्य, स्वराज्य, अनासक्ती आणि ईश्वराचा शोध यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर गांधीजींनी मांडलेले विचार समाविष्ट आहेत.

लिलावाला मिळालेल्या प्रतिसादावर संस्थेची प्रतिक्रिया
सफ्रोनआर्टचे सह-संस्थापक दिनेश वझिराणी यांनी या लिलावाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आनंद टी. हिंगोराणी संग्रह लिलावात आणणे आणि गांधीजींच्या जीवनाचा तसेच विचारांचा एक अद्भुत ठेवा सादर करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान होता. एका वैयक्तिक आणि जवळच्या नात्याच्या दृष्टीकोनातून भारतातील एका महान नेत्याचे विचार पाहण्याची संधी मिळणे ही गोष्ट या संग्रहाला अधिक खास बनवते. गांधीजींनी सार्वजनिक आयुष्यात ज्या तत्त्वांचा पुरस्कार केला, ते त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कसे जगले याची दुर्मिळ झलक या संग्रहातून पाहायला मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Bombay HC On Thane Eatery Case : FDA ने परवाना निलंबित केलेल्या ठाण्यातील उडुपी स्वाद रेस्टॉरंटला हायकोर्टाचाही झटका; अंतरिम दिलासा देण्यास नकार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number