NPS Vatsalya: मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लहान वयातच सुरू करा बचत; जाणून घ्या, एनपीएस वात्सल्य योजनेचे नियम व फायदे

या योजनेची अंमलबजावणी, कागदपत्रे, केवायसी, आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या नियमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

NPS Vatsalya: मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लहान वयातच सुरू करा बचत; जाणून घ्या, एनपीएस वात्सल्य योजनेचे नियम व फायदे

NPS Vatsalya Rules: लहान वयापासूनच मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बचत करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya) हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. या योजनेअंतर्गत पालक किंवा कायदेशीर पालक आपल्या अल्पवयीन पाल्याच्या नावाने खाते उघडू शकतात. अवघ्या 250 रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीपासून या योजनेची सुरुवात केली जाऊ शकते, तर यात जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. या खात्याद्वारे मुलांमध्ये सुरुवातीपासूनच बचतीची सवय रुजण्यास मदत होते. या योजनेची अंमलबजावणी, कागदपत्रे, केवायसी, आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या नियमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

कोण उघडू शकते एनपीएस वात्सल्य खाते आणि काय आहेत आवश्यक कागदपत्रे?
18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले कोणतेही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, अनिवासी भारतीय (NRI) आणि परदेशी नागरिकत्व असलेले भारतीय वंशाचे (OCI) मूलदेखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. खाते उघडण्यासाठी पाल्याचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, किंवा पासपोर्ट यांसारखा वयाचा पुरावा आवश्यक असतो. पालकांसाठी केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, किंवा मतदार ओळखपत्र यांपैकी कोणतेही ओळखपत्र आणि पॅन कार्ड सादर करणे गरजेचे आहे. भारतीय रहिवासी असलेल्या मुलांसाठी खाते उघडताना बँक खाते अनिवार्य नसले, तरी पैसे काढताना किंवा वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलाचे स्वतःचे किंवा पालकांसोबत संयुक्त बँक खाते असणे आवश्यक असते.

खाते उघडण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध पेन्शन फंड मॅनेजर्स
पालक पीएफआरडीए (PFRDA) मान्यताप्राप्त पॉईंट ऑफ प्रेझेंस (PoP) केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाइन eNPS प्लॅटफॉर्मद्वारे हे खाते उघडू शकतात. खाते उघडताना सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA) आणि पेन्शन फंडची निवड करावी लागते. सध्या भारतात 10 मान्यताप्राप्त पेन्शन फंड मॅनेजर्स कार्यरत आहेत, जे जमा केलेल्या रकमेचे व्यवस्थापन करतात:

– आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पेन्शन फंड (5 वर्षांचा परतावा: 10.37 टक्के वार्षिक)
– कोटक महिंद्रा पेन्शन फंड (5 वर्षांचा परतावा: 10.22 टक्के वार्षिक)
– यूटीआय रिटायरमेंट सोल्यूशन्स (5 वर्षांचा परतावा: 9.97 टक्के वार्षिक)
– एचडीएफसी पेन्शन फंड (5 वर्षांचा परतावा: 9.70 टक्के वार्षिक)
– आदित्य बिर्ला सन लाईफ पेन्शन फंड (5 वर्षांचा परतावा: 9.68 टक्के वार्षिक)
– एलआयसी पेन्शन फंड (5 वर्षांचा परतावा: 9.45 टक्के वार्षिक)
– एसबीआय पेन्शन फंड (5 वर्षांचा परतावा: 8.97 टक्के वार्षिक)
– अ‍ॅक्सिस पेन्शन फंड, टाटा पेन्शन मॅनेजमेंट आणि डीएसपी पेन्शन फंड मॅनेजर्स

18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अंशतः रक्कम काढण्याचे नियम
एनपीएस वात्सल्य खात्यातून मुलाचे वय 18 वर्षे होण्यापूर्वी काही विशेष परिस्थितींमध्ये पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी खाते किमान 3 वर्षे जुने असणे बंधनकारक आहे. मुलाचे शिक्षण, गंभीर आजारावरील उपचार, किंवा 75 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व यांसारख्या कारणांसाठी एक एकूण जमा रकमेच्या जास्तीत जास्त 25 टक्के रक्कम काढता येते. 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारे जास्तीत जास्त 2 वेळाच आंशिक रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते.

हेही वाचा – Maharashtra Govt DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारची मोठी भेट; महागाई भत्त्यात वाढ

वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्याचे काय होते?
मूल 18 वर्षांचे झाल्यानंतर पुन्हा नवीन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यानंतर हे खाते सामान्य एनपीएस टायर-1 खात्यात रूपांतरित होते. या वेळी जर खात्यातील एकूण जमा रक्कम 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर सर्व रक्कम एकाच वेळी काढता येते. मात्र, जमा रक्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास किमान 80 टक्के रकमेतून ॲन्युईटी खरेदी करावी लागते आणि उर्वरित 20 टक्के रक्कम रोख स्वरूपात काढता येते. काही विशेष परिस्थितीत एकूण कॉर्पस 8 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास संपूर्ण रक्कम काढण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. तसेच, मूल वयाच्या 21 वर्षांपर्यंत हे खाते एनपीएस वात्सल्य स्वरूपात सुरू ठेवू शकते किंवा सामान्य एनपीएस खात्यात हस्तांतरित करू शकते.

कर सवलत आणि गुंतवणुकीपूर्वी घ्यावयाची काळजी
पालकांना एनपीएस वात्सल्य योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80CCD(1B) अंतर्गत दरवर्षी 50,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त कर सवलत मिळू शकते, जी कलम 80C च्या 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेव्यतिरिक्त असते. ही सवलत जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता, केवळ मागील काही वर्षांच्या परताव्यावर अवलंबून न राहता, पेन्शन फंडचा दीर्घकालीन परफॉर्मन्स, जोखीम, आणि आपल्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन योग्य पेन्शन फंड मॅनेजरची निवड करणे फायदेशीर ठरते.

हेही वाचा – Property Tax Hike : सर्वसामान्यांना महागाईचा नवा झटका, घर खरेदी-विक्री महागणार; पालिकेचा नवीन कर प्रस्ताव मंजूर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number