Oil Price Hike: गेल्या काही काळापासून सर्वसामान्य नागरिक महागाईच्या समस्येशी लढा देत आहेत. दैनंदिन वापरातील वस्तू, भाज्या, डाळी आणि इंधनाचे भाव सतत वाढत असतानाच आता स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलानेही नागरिकांच्या खिशाला मोठी झळ लावली आहे. मोहरी, पाम, सूर्यफूल आणि शेंगदाणा या सर्वच प्रमुख तेलांचे भाव गगनाला भिडले आहेत. चालू हंगामात पावसामुळे आवक मंदावल्याने बाजारातील पुरवठा साखळी बाधित झाली आहे, ज्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील किमतींवर दिसून येत आहे.
घाऊक व किरकोळ बाजारातील दरवाढ
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि जौनपूर यांसारख्या विविध कृषी उत्पन्न बाजारांमध्ये मोहरीच्या तेलाचे घाऊक दर 7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. येत्या काळात हा भाव 8000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडेल असा अंदाज स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. किरकोळ बाजारात सध्या मोहरीचे तेल 220 रुपये प्रति किलो या दराने विकले जात असून अवघ्या एका महिन्यात यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
सरकारी आकडेवारी आणि तेलांचे सुधारित दर
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, सध्या देशपातळीवर मोहरीच्या तेलाचा सरासरी दर 197.25 रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. महिन्याभरापूर्वी हा दर 194.15 रुपये होता, तर मागील वर्षाच्या 15 ऑगस्ट 2025 रोजी तो केवळ 118.20 रुपये होता. यावरून वर्षभरात झालेली मोठी दरवाढ स्पष्ट होते. पाम तेलाचे दरही गेल्या वर्षीच्या 130.24 रुपयांवरून 149.57 रुपयांवर पोहोचले असून यात तब्बल 14 टक्के म्हणजेच 20 रुपयांची वाढ झाली आहे.
सूर्यफूल, शेंगदाणा तेल आणि सरकारी निर्णय
इतर तेलांचा विचार केल्यास सूर्यफूल तेलाच्या किमतीत 19 टक्केची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 159 रुपये असलेले सूर्यफूल तेल आता 191.16 रुपयांवर पोहोचले आहे. शेंगदाणा तेलाचा दरही 10 टक्क्यांने वाढून 185.26 रुपयांवरून थेट 205.39 रुपये प्रति किलो झाला आहे. अशा सर्वसमावेशक महागाईच्या काळात सरकारने निर्यातीवर असणारा विंडफॉल टॅक्स कमी करून पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.